मध्यरात्री अडीच वाजता हळदी समारंभाचा नाचगाणे सूरु असताना डीजे बंद केल्याने राग आलेल्या पोलीस उपनिरिक्षकाने भावालाच मारहाण सूरु केली. स्वता पोलीस उपनिरिक्षक असल्याचा धाक या पोलीस अधिका-याने नातेवाईक आणि गावक-यांना दाखविल्याने वैतागलेल्या गावक-यांनी अखेर खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पनवेल तालुक्यातील नेवाळी गावातील जयेश पाटील यांच्या घरासमोर रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक रोशन काथारा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देवनाथ काथारा यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवनाथ यांनी मध्यरात्र झाल्याने अडीच वाजता डीजे बंद केला. पोलीस उपनिरिक्षक काथारा यांना नाच करता आला नाही.
याचा राग मनात धरुन त्याने ते पोलीस अधिकारी आहेत असे जमलेल्या गावक-यांना बजावले. तसेच रोशन याने देवनाथ व लक्ष्मण यांना मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुभाष गडगे यालाही पोलीस अधिकारी रोशन याने मारहाण केली. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीसांना शिस्त लागावी यासाठी विविध प्रयोग पोलीस दलात करत आहेत. आजपर्यंत सामान्य नागरिकांशी गैरवर्तन करणा-यांविरोधात तीन पोलीसांवर विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर निलंबित करण्याची कारवाई आयुक्त भारंबे यांनी केली आहे. पोलीस अधिकारी काथारा यांच्यावर आयुक्त काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.