मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात कांदा-बटाटा मार्केटमधील बँकेने ‘सील’ केलेल्या एका गाळ्याबाहेर तैनात  असलेल्या खासगी सुरक्षारक्षकाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली.

‘जी’ विंगमधील गाळा क्रमांक-२०३  हा गाळा एका खासगी बँकेने जप्त  केला आहे. करोना काळात हा गाळा बंद असतानाही सुरक्षारक्षक नेमण्याची आवश्यकता होती का, असा सवाल केला जात आहे. तर या गोष्टीकडे  एपीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा १२च्या सुमारास सुरक्षारक्षकाला अचानक अत्यवस्थ वाटू लागल्याने तो चक्कर येऊन खाली पडला. रात्री उशिरापर्यंत त्याला उपचार मिळाले नाहीत. काही तासांनी त्याला रुग्णवाहिकेतून नेले जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सुरक्षारक्षकाचा मृतदेह वाशी येथील पालिका रुग्णालयात पाठवण्यात असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.