वाहनचालकांसाठी प्रवास सुकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि काही सामाजिक संस्थांच्या विनंतीवरून नियम धाब्यावर बसवून शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेले सुमारे अडीच हजार गतिरोधक पालिकेच्या अभियंता विभागाने गेल्या चार दिवसांत भुईसपाट केले आहेत. हे गतिरोधक बांधताना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात आल्या होत्या. त्यामुळे अभियंता विभागाने शाळा, रुग्णालयांची ठिकाणे वगळता सर्वच ठिकाणचे गतिरोधक काढून टाकले आहेत. त्यामुळे किरकोळ अपघात वाढू लागले आहेत.

पालिकेने मागील काही वर्षांत ‘मागणी तसा पुरवठा’ करत शहरात पाच हजारांपेक्षा जास्त गतिरोधक बांधले होते. लांबी, रुंदी व उंचीचे नियम न पाळता बांधण्यात आलेल्या या गतिरोधकांमुळे वाहनांचे नुकसान होत असे. त्याविरोधात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ‘वॉक विथ कमिशनर’ या कार्यक्रमात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे सर्व नियमबाह्य़ गतिरोधक हटविण्याचे आदेश मुंढे यांनी दिले होते.

एकटय़ा ऐरोलीत ८० गतिरोधकांचा समावेश आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या विनंतीवरून पालिकेने हे गतिरोधक उभारले होते. अचानक हे गतिरोधक भुईसपाट करण्यात आल्याने वाहनचालकांचा प्रवास सुखावह होत आहे, मात्र पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागल्याचा आक्षेपही घेण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसून अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे.

नवी मुंबई हे इतर शहरांपेक्षा नियोजनबद्ध शहर असल्याने या ठिकाणचे रस्ते हे विस्तीर्ण आहेत. अलीकडेच पालिकेने सिमेंट क्राँक्रीटीकरण केले आहे. त्यामुळे वाहनचालकांचा विशेषत: दुचाकीस्वारांचा वेग वाढल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे. अपघात टाळावेत यासाठी सातत्याने तक्रारी करून हे गतिरोधक बसविण्यात आले होते, पण ते नियमबाह्य़ असल्याच्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढू लागल्या होत्या. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. त्यामुळे गतिरोधक बांधताना त्यांची लांबी रुंदी आणि उंची निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात ‘इंडियन रोड काँग्रेस’ने काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. यात गतिरोधकांची लांबी १३६५ मीटरपेक्षा जास्त असता कामा नये. उंची त्यांच्या मध्यभागी १०० मीटर असावी. या नियमांचे पालन न केल्याचे दिसते. चारचाकी वाहनांची खालची बाजू या गतिरोधकांना लागून वाहनांचे नुकसान होत असल्याचेही दिसून आले आहे.

शहरातील विनापरवाना गतिरोधक हटवण्यात आले आहेत. दैनंदिन बाजार, शाळा, रुग्णालय यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी असलेले गतिरोधक कायम ठेवण्यात आले आहेत, मात्र अनावश्यक व नियमबाह्य़ गतिरोधक काढून टाकण्याबाबत तक्रारी आल्याने ते भुईसपाट करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी नियमांत राहून लवकरच गतिरोधक बसविण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात एक आराखडा तयार केला जात आहे.

मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action illegal speed breaker
First published on: 01-04-2017 at 01:01 IST