रमाईमाता झोपडपट्टी, भीमनगर झोपडपट्टीतील कारवाई
खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर १२ मधील रमाईमाता झोपडपट्टी व भीमनगर झोपडपट्टी येथील हजारांहून अधिक झोपडय़ांवर सिडकोने बुधवारी कारवाई केली. गेल्या दोन ते तीन वर्षांत या भागातील झोपडय़ांत झपाटय़ाने वाढ झाली होती. सामाजिक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आणि सिडको प्रशासनाला ही जागा विकासकांना ताब्यात द्यायची असल्याने ही कारवाई करण्यात आली. या वेळी कडेकोट बंदोबस्त तैनात होता.
सेक्टर १२ मधील १६ हेक्टरचा परिसर दिवा-पनवेल लोहमार्गाला खेटून आहे. याच जागेवर झोपडय़ा वसवण्यात आल्या होत्या. सिडको प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर त्यावर नियंत्रण ठेवता आले असते. खांदेश्वर वसाहतीमधील काही पुढाऱ्यांनी या झोपडपट्टीला आश्रय दिल्यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना सरकारी स्तरावरील विविध पुरावे जमविता आले. बुधवारी जमीनदोस्त केलेल्या झोपडय़ांपैकी अनेक झोपडय़ा या राजीव गांधी आवास योजनेतून स्वत:ला घर मिळेल या अपेक्षेने बांधण्यात आल्या होत्या. एक लाख ते अडीच लाख रुपयांना या झोपडय़ांची खरेदी-विक्री करण्यात आली होती. काही झोपडीधारकांनी झोपडीची रक्कम वसूल करण्यासाठी खरेदी केलेल्या झोपडय़ांमध्ये अजून नवीन झोपडी बांधून तिची विक्री केली होती. आधार कार्डपासून ते राजीव गांधी आवास योजनेसाठीही हे झोपडीधारक पात्र ठरविले जात होते. नेत्यांच्या पाठिंब्यांमुळेच सिडको प्रशासन या झोपडपट्टीवर कारवाई करण्यात मागे पडत होते. अखेर पत्रकार कांतिलाल कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिडको प्रशासनाकडे मागील तीन महिन्यांपासून पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला खांदेश्वरमधील रूपा सिन्हा, विजय काळे, राहुल रोटे, अॅड. किरण घरत, जयंत भगत, अनिल बनगर, दर्शना भडांगे, संतोषी मोरे व इतर जागरूक नागरिकांनी साथ दिली. कडू व त्यांच्या साथीदारांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून ते दक्षता अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना निवेदने दिली होती. सिडको प्रशासनाने रिकाम्या केलेल्या जागेचे चटईक्षेत्र हे कमाल असल्यामुळे सिडको प्रशासन या मोक्याच्या भूखंडाचा ताबा सोडण्यास तयार नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेचा हातभार
पनवेल महापालिका खांदेश्वरमधील झोपडय़ांच्या विरोधात असल्याने त्यांनीही या झोपडय़ा जमीनदोस्त करण्याच्या कारवाईमध्ये सिडको प्रशासनाला सहकार्य केले. सिडकोच्या पथकासह पालिकेचे काही कर्मचारी येथे नेमण्यात आले होते. स्वत: आयुक्त सुधाकर शिंदे यांनी कारवाईचे समर्थन करत पात्र लाभार्थीना घरे मिळतील, असे आश्वासन या वेळी दिले.
आयुक्तांचा मदतीचा हात
सिडको प्रशासन व पोलिसांनी या कारवाईची माहिती झोपडपट्टीधारकांना सोमवारी दिली होती. तरीही या झोपडपट्टीमधील नागरिकांनी आपले बस्तान हलविले नाही. अखेर बुधवारी सकाळी सिडको प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. या कारवाईदरम्यान वैशाली शिंदे या बारावीच्या विद्यार्थिनीलाही बेघर व्हावे लागले. काही रहिवाशांनी वैशालीला ५०० रुपये दिले तर काहींनी तात्पुरती सोय करतो, अशी आश्वासने दिली.