लोकसत्ता,प्रतिनिधी
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांतील नर्सरीच्या वर्गासाठी २०२३-२४ करिता प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका शिक्षण विभागाने दिली आहे. सीवूड्स व कोपरखैरणे अशा दोन शाळा मिळून २४० विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे कोपरखैरणे, सेक्टर-११ आणि नेरूळ, सेक्टर-५० या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा चालू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये नर्सरी वर्गाकरीता प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. हा प्रवेश पूर्णत: निःशुल्क असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशासाठी पाल्याचे वय ३ वर्षे पूर्ण (३१ डिसेंबर २०२३ दिवसापर्यंत) असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,आधारकार्ड, वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत.
आणखी वाचा- नवी मुंबई: नियोजित शहरात ‘वॉकेबिलिटी’ योजनेचे तीनतेरा
प्रवेश अर्ज संबंधित शाळेत २५ मार्च पर्यंत सर्वकागद पत्रांसह भरून देणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी शाळेपासून १ कि.मी. चे आत अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास नियुक्तीसाठी लॉटरी पध्दत अवलंबवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत प्रवेश अर्ज देण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पालिकेच्या शाळांना मागील अनेक वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सुलभा बारघरे यांनी दिली आहे.आज प्रवेश अर्ज मिळण्याच्या पहिल्याच दिवशी पालकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आणखी वाचा- नवी मुंबई : हापुसची आवक वाढली; दरात घसरण
नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएससी शाळांना चांगला प्रतिसाद असून कोपरखैरणे येथील शाळा महापालिकेच्या वतीने तर सीवूड येथील शाळा आकांक्षा या खाजगी संस्थेच्या वतीने चालवण्यात येत आहे.