|| विकास महाडिक

दक्षिण बाजूकडील ८० मीटर उंच टेकडीची उंची दहा मीटपर्यंत कमी करणार

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उड्डाणाला प्रमुख अडथळा ठरलेली उलवा टेकडीची उंची सिडकोने आठ मीटपर्यंत कमी केल्यानंतर सिडकोला आता दक्षिण बाजूकडील ८० मीटर उंच असलेल्या एका दुसऱ्या टेकडीची उंची दहा मीटपर्यंत कमी करावी लागणार आहे. महिनाभरात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षी या दुसऱ्या टेकडीची उंची कमी करण्याची अट सिडकोला घातली होती.

विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर पाचशे मीटरच्या आसपास सुरुंग स्फोट लावता येणार नसल्याने या टेकडीची उंची आधीच कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या टेकडीमध्ये जास्तीत जास्त दगडांचा समावेश आहे. या टेकडीच्या जवळ साडेबावीस टक्के योजनेअंर्तगत प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन वसाहत उभारली जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला म्हणावा तितका वेग आलेला नाही. यात दोन प्रमुख अडथळे आहेत. दहा गावांपैकी तीन गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी सिडकोने माजी सनदी अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आहे. तीन गावांत २५० ते ३०० प्रकल्पग्रस्तांना भरपाई आणि रोजगार हमी हवी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबरोबरच उलवा येथील दक्षिण बाजूस प्रस्तावित पुष्पकनगर वसाहतीच्या जवळ असलेली एक ८०-८५ मीटर उंच टेकडी या प्रकल्पाला अडथळा ठरू पाहत आहे. सिडकोने दोन वर्षांपूर्वी ९५ मीटर उंच असलेली एक टेकडीची उंची आठ मीटपर्यंत कमी केली आहे. नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या तपासणीत या टेकडीच्या दक्षिण  बाजूस असलेली दुसरी एक टेकडीची उंची कमी करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे सिडकोसमोर दुसरा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. अगोदरची टेकडी कमी करतानाच ही टेकडी कमी करण्याची अट घातली गेली असती तर आतापर्यंत ही टेकडी देखील नष्ट झाली असती असे अभियंत्याचे मत आहे. विमानतळ प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर पाचशे मीटर क्षेत्रात सुरुंग स्फोट करता येणार नाही. त्यामुळे त्यामुळे तिची उंची कमी करण्याची निविदा सिडकोने आत्ताच काढलेली आहे. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आणि दुसऱ्या टेकडीची उंची कमी करणे या दोन कारणांमुळे हा प्रकल्प आणखी दोन वर्षे रखडणार आहे.

तीनशे कोटी रुपये खर्च

नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील ८० ते ८५ मीटर उंच टेकडीची उंची कमी करण्यासाठी सिडकोला तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे. या टेकडीची उंची कमी करताना एक लाख ५५ कोटी क्युबिक मेट्रिक टन माती या उत्खननातून निघणार आहे. ही माती आजूबाजूच्या भरावासाठी वापरण्यात येणार आहे. अगोदर या कामाचा खर्च ४३५ कोटी होणार होता. मात्र सिडकोच्या अभियंता विभागाने हा खर्च कमी केला असून सिडकोचा १८८ कोटी होणारा अतिरिक्त खर्च वाचला आहे. महिन्याभरात या कामाला सुरुवात होऊन एक वर्षांत हे काम संपणार आहे. भारतीय इन्फ्रा नावाच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

पुष्पकनगर जवळील टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला एका महिन्यात सुरुवात केली जाणार आहे. दहा मीटपर्यंत ही उंची कमी केली जाणार असल्याने त्याला एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. -राजेंद्र धयाटकर, मुख्य अभियंता, सिडको (विमानतळ प्रकल्प)