अलकनंदा को.ऑ. हा. सो. नेरुळ सेक्टर १९ अ
सामाजिक क्षेत्रात कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. समाजाला काहीतरी देऊ इच्छिणाऱ्यांची एक मोठी फळी तयार करावी लागते. नेरुळ येथील अलकनंदा संकुलाने अशी फळी तयार केली आहे. या संकुलातील रहिवाशांनी सामाजिक कार्याची नियोजनबद्ध सुरुवात केली आहे.
नेरुळ सेक्टर १९-अ येथे १९९४ मध्ये अलकनंदा को.ऑ. हा. सो. स्थापन करण्यात आली. सोसायटीत एकूण १८३ कुटुंब राहतात. या सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन काहीतरी सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच सोसायटीत दान उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरकारी पातळीवर दान उत्सव देशभर साजरा केला जातो. त्याच पाश्र्वभूमीवर संकुलातही गेली पाच वर्षे दान उत्सव साजरा केला जात आहे. या कालावधीत देणगी, धान्य, औषधे, अन्य उपयुक्त वस्तू विविध सामाजिक संस्थांना देण्यात येतात. ऐरोलीतील मदर टेरेसा ट्रस्ट, सीवूड्स येथील मातृमीलन, पाणी फाऊंडेशन, जम्मू-काश्मीर पूरग्रस्त अशा अनेक संस्था, गरजू आणि आपत्तीग्रस्तांना या संस्थेने मदत केली आहे.
संकुलातील रहिवासी वर्षभर साठवलेली रद्दी एकत्रित करून विकतात. त्यातून साधारण १० हजार रुपये मिळतात ते संकुलासाठी वापरले जातात. संकुलातील महिला विविध कलाकौशल्यांमध्ये निपुण आहेत. त्यांना प्रदर्शन आणि विक्रीच्या रूपाने व्यासपीठ मिळवून दिले जाते. त्यात त्या विविध प्रकारचे पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, कपडे यांची विक्री करतात. संकुलाच्या आवारातच भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनातून गोळा होणारा निधी संकुलाच्या विकासासाठी वापरला जातो.
नवी मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोसायटीत इंटरकॉम प्रणाली असून सर्व घरे इंटरकॉमने जोडण्यात आली आहेत. नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छ भारत अभियान प्रत्यक्षात आणण्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कचरा वर्गीकरण, शून्य कचरानिर्मिती आणि खतनिर्मितीत सोसायटीने सहभाग नोंदविला आहे. पालिका किंवा सरकारने कितीही प्रयत्न केले तरीही लोकसहभागाशिवाय परिवर्तन आणि विकास शक्य नाही, यावर येथील रहिवाशांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे विविध योजना, मोहिमांची माहिती देण्यासाठी सोसायटीच्या आवारात जनजागृती आणि मार्गदर्शनपर उपक्रम राबवले जातात.
संकुलाचा परिसर अत्यंत रमणीय आहे. अनेक झाडे आणि नीट जपलेली हिरवळ यामुळे परिसरात नेहमीच गारवा असतो. आवारात सर्वत्र हिरवळ आहे. झाडांचा पालापाचोळा एकत्र करून मोठय़ा वृक्षांच्या मुळांजवळ ठेवला जातो. कालांतराने त्यापासून खत तयार होते. हे खत संकुलातील इतर वृक्षांसाठीही वापरले जाते.
सेन्सॉर प्रणालीतून पाणी बचत
संकुलात पाण्याच्या टाकी असलेल्या ठिकाणी सेन्सॉर प्रणाली लावण्यात आली आहे. पाण्याची टाकी भरताच अलार्म वाजू लागतो आणि मोटार बंद करण्याची सूचना सोसायटीतील कर्मचाऱ्यांना मिळते. त्यामुळे टाकी भरून वाहू लागत नाही आणि पाण्याचा अपव्यय टाळता येतो. कमी वीज वापरून पाणी खेचणारी मोटार बसवण्यात आली आहे, असे सदस्यांनी सांगितले. तसेच संकुलाच्या परिसरात कूपनलिका आहे. त्यातील पाण्याचा वापर उद्यानातील झाडांसाठी आणि वाहने धुण्यासाठी केला जातो.