देवगडचा ६०० तर कर्नाटक हापूसच्या २५००पेटय़ा दाखल

थंडीच्या पोषक वातावरणामुळे यंदा हापूसचे उत्पादन चांगले असून एपीएमसी बाजारात सोमवारी हापूसची विक्रमी आवक झाली. देवगड हापूसच्या ६०० तर कर्नाटक  हापूसच्या २ हजार ५०० पेटय़ा बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एक हजाराने भावही उतरले आहेत. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने हापूसचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा होती. परंतु अवेळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे उत्पादन व दर्जावर परिणाम झाला होता. या वर्षी मात्र कोकणात सध्या थंडीचा कडाका सुरू असून हापूसला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसच्या ६०० पेटय़ा दाखल झाल्या असून बाजारभाव १ हजार रुपयांनी उतरले असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली. ४ ते ६ डझनला २ ते ५ हजार रुपये बाजारभाव होता. आज १ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव उतरले आहेत.

कर्नाटक हापूसच्या २५० पेटय़ा दाखल झाल्या असून प्रतिकिलो २००ते ३०० रुपये बाजारभाव आहेत. दर वर्षी या महिन्यात १००-१२५ पेटय़ा दाखल होत असतात. यंदा मात्र मोठी आवक सुरू झाली आहे. हापूसचा खरा हंगाम हा १५ मार्चनंतर सुरू होतो तर १५ फेब्रुवारीपासून मोठय़ा प्रमाणात हापूस दाखल होतो. या वर्षी जानेवारी अखेरीसच मोठी आवक सुरू झाली असून ती या महिन्यातील आतापर्यंतची उच्चांकी आवक असल्याचे फळ व्यापाऱ्यांनी सांगितले.

‘आगप’च्या शेतमालाने आवक वाढली

हा हापूस ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील मोहोर लागलेले उत्पादन आहे. या कालावधीत जादा पाणी लागू नये म्हणून आंबा उत्पादक काळजी घेत त्याचे संवर्धन करतात. प्लास्टिक आवरण लावून पाण्यापासून संरक्षण केले जाते. त्यातून जगलेल्या आंब्याला आगपचा माल, असे म्हटले जाते. ही आवक या आगपची असून लागवडीचे क्षेत्रही वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंतची जानेवारी महिन्यातील ही मोठी आवक आहे. हा ‘आगप’चा माल असल्याने आवक वाढली आहे. मात्र यंदा लवकरच जादा प्रमाणात हापूस दाखल झाला आहे.     – संजय पानसरे, घाऊक फळ व्यापारी, एपीएमसी