पुरातत्त्व विभागाकडे तपास करण्याची मागणी
चिरनेरमधील कुंभारखाण या ठिकाणी आढळून आलेल्या पायऱ्या पुरातन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिरनेरवरून मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या व गावाच्या दक्षिण भाग असलेल्या पठारावरील खासगी जागेचे मातीच्या भरावासाठी उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन सुरू असताना रविवारी मातीखाली काही पायऱ्या आढळून आल्या आहेत. या पायऱ्यांमुळे चिरनेरच्या मातीत पुरातन इतिहास दडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधीही या परिसरात पुरातन शिलालेख, नाणी, भांडय़ांचे तुकडे आढळले असून उरण परिसरात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय नसल्याने तसेच इतिहासतज्ज्ञ नसल्याने या पायऱ्या पुरातन असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, उरणमधील विरेश मोडखरकर यांनी पुरातत्त्व विभागाकडे ई-मेलद्वारे संपर्क करून या पायऱ्यांची चाचणी करावी अशी मागणी केली आहे.
चिरनेर हे गाव प्राचीन असून अल्लाउद्दीन खिलजीपासून या भागाच्या इतिहासाला सुरुवात होते. गावात पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. या मंदिरा लगत असलेल्या तलावात यापूर्वी शिलालेख सापडले आहेत. तसेच माती आणण्यासाठी जाणाऱ्या तसेच गुरख्याचे काम करणाऱ्यांनी काही नाणीही सापडली आहेत. यात मातीच्या खापऱ्या तसेच इतर भांडय़ाचे अवशेषही यापूर्वी आढळल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते. चिरनेरला स्वातंत्र्य लढय़ातील जंगल सत्याग्रहातील रक्तरंजित इतिहासाचीही पाश्र्वभूमी आहे. चिरनेर परिसरात पुरातन वास्तू आणि वस्तू सापडू लागल्याने या पायऱ्यांचा पुरातत्त्व विभागाने तपास करावा यासाठी ही माहिती ई-मेलद्वारे दिल्लीतील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उरणमधील विरेश मोडखरकर यांनी दिली.