शिरवणे
समुद्रसपाटीपासून नव्वद मीटर उंच असलेले एकमेव गाव म्हणजे शिरवणे. हे सर्वात उंच गाव असल्याने मनुष्याच्या शिरासारखे (डोके) उंच म्हणून शिरवणे असे काहीसे नाव या गावाला पडल्याचे ग्रामस्थ सांगतात, पण ती दंतकथाच! उंच टेकडीवर वसलेल्या गावाच्या चारही बाजूने कधीकाळी निसर्गसंपदा होती. या गावाला नाटय़कलेचाही वारसा होता. कस्तुरबा गांधी यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.
शीव-पनवेल महामार्गावरील जुन्या हर्डिलिया कंपनीच्या समोर एका उंच टेकडीवर शिरवणे गाव वसलेले आहे. झपाटय़ाने झालेल्या नागरीकरणामुळे आज हे गाव दिसत नाही. नेरुळच्या उड्डाणपुलावरून या गावाचा काही अंश अलीकडे दिसू लागला आहे. छोटी बैठी घरे असलेल्या गावात आता अनेक इमारती, बंगले यांचे अस्तित्व निर्माण झाले आहे. नेरुळ रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचे पूर्वी वरचा पाडा, खालचा पाडा आणि नौपाडा असे तीन भाग होते. टेकडीवर राहणाऱ्या ग्रामस्थांना वरच्या पाडय़ावरील वस्ती म्हणून म्हटले जात होते, तर सध्या शिवाजी नगर म्हणून तयार झालेल्या लोकवस्तीला खालचा पाडा म्हणून संबोधिले जात होते. याच भागात नेरुळ सेक्टर तीनच्या भागात नौपाडा नावाने ग्रामस्थांची काही वसाहत होती. या तीनही पाडय़ांवरील पंधरा ते वीस कुटुंबाचा समूह म्हणजेच शिरवणे गावाची लोकसंख्या होती. त्या वेळच्या दोनशे-अडीचशे ग्रामस्थांची संख्या आता अडीच ते तीन हजारांच्या घरात गेली आहे. पूर्व बाजूस सह्य़ाद्रीच्या रांगा असलेला डोंगर आणि पश्चिम बाजूस मिठागरे तर दक्षिणेस दारावे गाव आणि उत्तरेस कुकशेत गावाची सीमा अशा चर्तुसीमेवर हे गाव वसले होते. गावाच्या आसपास तुरळक लोकवस्ती असल्याने गावाच्या माथ्यावरून तसेच समोरच्या डोंगर, नदी, नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी आणि त्यामुळे निर्माण होणारे झरे या गावाच्या तीन बाजूने दिसून येत होते. त्यामुळे गावातील घरांमधून पावसाळ्यातील दृश्य नयनरम्य होते. तीन बाजूने असलेली शेती आणि एका बाजूला असलेली मिठागरे ही रोजगाराची साधने होती. त्यामुळे शेती आणि पोटापुरती मासळी हा येथील बहुसंख्य आगरी समाजाची दैनंदिनी मानली जात होती. त्यात काही ग्रामस्थ मिठागरांवर मोलमजुरी करण्यासाठी जात होते. आगरी समाजाबरोबरच बारा बलुतेदारांची संख्याही या गावात लक्षणीय होती. यात पाटील आणि सुतार कुटुंबांचा मान गावात मोठा आहे. गावाच्या पूर्व बाजूस असलेले वाघोबाचे मंदिर उत्तरेस असलेले करंजा देवी व हनुमान मंदिर, पश्चिमेस असलेले गणोबा अर्थात गणरायाचे मंदिर ही चार मंदिरे ग्रामस्थांच्या श्रद्धेची मंदिरे आहेत.
काही वर्षांपूर्वी गणरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्या वेळी संपूर्ण ग्रामस्थांनी गाव व नगर प्रदक्षिणा करण्यात आली होती. भजन, पोथी, पुराण वाचन ही गावची संस्कृती आजही कायम आहे. हनुमान जयंती आणि गणेश जयंती हे या गावातील सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जात आहेत. चैत्र वैद्य चतुर्थीला होणारी जत्रा गेली अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेली आहे. आजूबाजूच्या दोन गावांतील ग्रामस्थांनी केलेल्या भांडणामुळे ही जत्रा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. आता केवळ देवीला मानपान देण्याची परंपरा सांभाळली जाते. तसेच गावात तरवाची मिरवणूक काढली जाते. या गावाला स्वातंत्र्यापूर्वी प्लेग, कॉलरासारख्या साथीच्या आजारांनी चांगलेच हैराण केले होते. त्यामुळे शिरवणे गावात राहणारे ग्रामस्थ गाव सोडून खाली असलेल्या शेतांवर राहण्यास जात होते. प्लेगची साथ आटोक्यात यावी म्हणून देवांना नवस लावले जात होते. गावावर आजही कोणतेही संकट आले तर गावातील हनुमानाचा धावा केला जातो. त्याच हनुमानाची जयंती मोठय़ा धुमधडाक्यात साजरी केली जाते. गावात शिक्षणाची सोय नसल्याने बेलापूर किंवा तुर्भे येथेच या गावातील तरुणांसाठी शिक्षणासाठी पायपीट करावी लागत होती. बेलापूर येथील बाबा मास्तरांनी हनुमानाच्या मंदिरात पहिली खासगी शाळा सुरू केली. गावकऱ्यांच्या शिधावाटपावर ही शाळा बाबा मास्तर चालवीत असत. त्यामुळे गावातील काही तरुणांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि शिक्षकांचे गाव म्हणूनही या गावाची ओळख तयार झाली. अशाच रघुनाथ हरिदास पवास गुरुजींनी गावाचा इतिहास एका पुस्तिकेद्वारे लिहून ठेवला आहे. तो आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे. महात्मा गांधी यांच्या मिठागर आंदोलनात शिरवणेकरांनी दाखविलेला सहभाग त्यांना मीठ आणि जाळण्यासाठी लागणारे लाकूड मिळवून देण्यास कारणीभूत ठरला.
राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्य लढय़ासाठी शिरवणे गावात एक छावणी टाकली होती. त्या वेळी कस्तुरबा गांधी यांनी दिलेली गावाला भेट ग्रामस्थांच्या आजही स्मरणात आहे. गांधींच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग देणाऱ्या भट्टू भोईर आणि नारायण पाटील या दोन ग्रामस्थांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा प्राप्त झाला आहे. बेलापूर पट्टीत घणसोली आणि शिरवणे या दोन गावांतच स्वातंत्र्यसैनिकांचा दाखला आढळून आलेला आहे. दिवंगत सरपंच अरुण सुतार यांनी राजकीय मतभेदामुळे निर्माण झालेली गावातील कटुता १९८५ मध्ये अतिशय सामोपचाराने सोडवली होती. देवीची गाणी, भजन, तमाशा, नाटक, कुस्त्यांचे फड ह्य़ा करमणुकीच्या साधनांचा प्रचार आणि प्रसार इतर गावांतही करण्यात आला होता. वाशी, तुर्भे यानंतर सिडकोने गावठाण विस्तार योजना राबविलेले हे तिसरे गाव त्यामुळे गावाच्या चारही बाजूने आता शहरीकरण व औद्योगिकीकरण झालेले आहे.