तळोजा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळोजा पाचनंद गाव आहे. ७५ टक्के मुस्लीम लोकवस्ती असलेल्या या गावाची विविध प्रकारे ओळख आहे. त्यात या गावात १४ एकरवर असलेले विस्तीर्ण तलाव ही ओळख येथील रहिवाशांसाठी अभिमानास्पद आहे. या गावाच्या पूर्व बाजूस असलेल्या नॅशनल हॉटेलमधील बिर्याणी काही वर्षांपूर्वी चांगलीच प्रसिद्ध होती. त्यामुळे तळोजाची बिर्याणी खाण्यासाठी सिनेकलाकार दिलीप कुमार, धर्मेद्र, सायराबानू, शबाना आजमी यांची महिन्यातून एकदा तरी भेट ठरलेलीच होती. आता या बिर्याणीची लज्जत जरी राहिली नसली तरी पंचकृषीत घरांसाठी लागणारी कौले पुरवणारे गाव म्हणून या गावाची ओळख आजही आहे. मुघल काळात या गावाची निर्मिती झाल्याचे गावकरी सांगतात. पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या तलावातील मातीमुळे या गावाचे दोन भाग पडले असून एकीकडे हनुमानाचे मंदिर आणि दुसरीकडे जामा मस्जिद उभी आहे.

मुघल साम्राज्यातील एखाद्या सरदाराने या भागातून मार्गक्रमण करताना टाकलेल्या छावणीसाठी लागणारे पाणी उपलब्ध करण्याकरीता या विस्तीर्ण तलावाची निर्मिती करण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांचे मत आहे. संपूर्ण पंचकृषीत इतका मोठा तलाव नाही. त्यामुळे तलावाचे खोदकाम करण्यासाठी हजारो मजूर कामी आले होते. यात हिंदू आणि मुस्लीम यांचा समावेश असल्याने उत्तर बाजूस हनुमानाचे छोटे मंदिर तर पूर्वेस भव्य अशी मस्जिद आहे. अलीकडे ग्रामस्थांनी या इमारताचे सुशोभीकरण करून ती चार केली आहे. पण फार पूर्वी मुघल साम्राज्यांच्या खुणा असणारी ही जुनी छोटी मस्जिद होती. तलावाचे काम झाल्यानंतर १० कुटुंबं याच ठिकाणी वसली. यात पटेल, खामकर, काझी, आणि नमरे यांचा समावेश आहे. जेमतेम १० कुटुंबांची लोकसंख्या आता १४ हजारापर्यंत गेली आहे. या संख्येत वीस घरे कोळी समाजाची असून तेवढीच घरे दलित वस्तीची आहेत. मात्र गेली शेकडो वर्षे येथे हिंदू-मुस्लीम समाज अतिशय गुण्यागोविंदाने नादात आहे. देश आणि राज्यात झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीचा लवलेशही या गावात कधी दिसून आलेला नाही. या गावातील ग्रामस्थांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. पूर्व आणि पश्चिम बाजूस असलेली खाडी वगळता दक्षिण आणि उत्तरेला मोठय़ा प्रमाणात शेतीवाडी होती. त्यामुळे शेती आणि त्याला पूरक म्हणून भाजीचे मळे हे या गावाचे व्यवसाय होते. सिडकोच्या आगमानानंतर या गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पाचशे, सहाशे एकर जमिन संपादीत करण्यात आली आणि गावाचा रोजगार हातातून गेला. या जमीन संपादनाच्या बदल्यात येथील ग्रामस्थांना मोबदला मिळाला. त्यातून या ग्रामस्थांनी विविध पूरक व्यवसायांच्या वाटा चोखळल्या. त्यात वीट भट्टी, बांधकाम साहित्य पुरवठा, मंगळुरु कौल यांसारखे व्यवसाय ग्रामस्थांनी स्वीकारले. त्यामुळे या गावात शत-प्रतिशत व्यावसायिक ग्रामस्थ आहेत.

गावात वर्षांतून दोनदा येणारी ईद आणि तलावाजवळील पीर बाबाचा ऊरुस हे मोठे उत्सव मानले जातात. पनवेलकडे जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे ब्रिटिशकाळात रुंदीकरण झाले. त्यामुळे गावाजवळील नदीवर ब्रिटिशांनी बांधलेला एक जुना पूल दिसून येतो. गावाच्या दोन्ही बाजूने आता विस्तीर्ण असे रस्ते झाल्याने गावाचा विकास झाला आहे. सिडकोने या गावाला चारही बाजूने साडेबारा टक्के योजनेचेचे भूखंड अदा केल्याने गावाचा गावठाण विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे बेकायेदशीर बांधकामांचाही पसारा वाढू शकला नाही.

गावात पहिल्यापासून एक ऊर्दू शाळा होती. मात्र स्वातंत्र्यानंतर महामार्गाच्या जवळ एक मराठी शाळा सुरू करण्यात आली. शिक्षणाबाबत तशी उदासीनता असलेल्या या गावात दोन ग्रामस्थांनी मात्र चांगले शिक्षण घेतले. मोहम्मद अली आर्शी आणि मोहसीन पटेल या तरुणांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता. यातील आर्शी यांनी तर गावाचे १५ वर्षे सरपंचपद भूषविले होते. मुंबईतील अंजुमन सोसायटीच्या शाळामंधून शिकविणारे आणि त्यासाठी तळोजा ते मुंबई असा नेहमीचा प्रवास करणारे आर्शीसाहेब म्हणजे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व. शिक्षणासाठी त्यांनी काही काळासाठी तळोजातून पळ काढला होता. ओळखीच्या काही नातेवाईकांच्या साहाय्याने त्यांनी पुणे गाठले आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतले. आर्शी आणि मोहसीन यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत गावाची प्रगती झाली. सर्वात मोठय़ा तलावाच्या या गावात पाच विहिरीदेखील होत्या. मात्र उन्हाळ्यात या विहिरींमधील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे नारूच्या आजाराने काही ग्रामस्थ आजारी पडले. आर्शी यांनी गावाच्या जवळ असलेल्या डोंगरावर एक छोटे धरण बांधून नळयोजना राबविली. पाण्याबरोबरच गटार, दिवाबत्ती गावात आणण्याचे श्रेयदेखील याच जोडीला जाते. यानंतर गफूर शेख यांनी गावासाठी काही योजना राबविल्या. सध्या गावात शिक्षणाचा चांगला प्रसार झालेला आहे. त्यामुळे उच्चविद्याविभूषित ग्रामस्थांची एक नवीन पिढी घडत आहे.

तलावामुळे गावाला शोभा

पाच गावांचा या गावातील ग्रामपंचायतीशी संबंध जोडला गेल्याने या गावाला तळोजा पाचनंद म्हणूनदेखील ओळखले जाते. गावाच्या समोरच तळोजा पाचनंद रेल्वे स्टेशन असून ते कोकण रेल्वेसाठी पूरक स्टेशन आहे. या स्टेशनच्या पूर्व बाजूस आता एक मोठी नागरी वसाहत उभी रहात आहे. बेलापूरहून सुटणारी मेट्रो ही याच नागरी वसाहतीचे शेवटचे स्टेशन आहे. त्यामुळे या गावाचा झपाटय़ाने विकास होताना दिसत आहे. डोक्यावर टोपी आणि कुर्ता हा येथील ग्रामस्थांचा सर्वाधिक पेहराव दिसून येतो. त्यामुळे गावात तरुण मंडळीदेखील याच पेहरावात दिसून येतात. कालपरतवे या गावातील कौल व्यवसाय मात्र बंद झाला असून तळोजाची त्या बिर्याणीची लज्जतदेखील कमी झाली आहे. मात्र गावाचा तलाव स्वच्छ आणि विलोभनीय आहे. या तलावामुळेच कदाचित या गावाला तळोजा असे नाव पडले असावे, असा ग्रामस्थांचा होरा आहे. तो पाहण्यासाठी एकदा या गावाला नक्कीच भेट द्यायला हरकत नाही.