कोकण विभागस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा २५ ते २७ नोव्हेंबरला खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. ही स्पर्धा आखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पनवेल शाखा, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयातर्फे होत आहे. या एकांकिकेची अंतिम फेरी ३ व ४ डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात होणार आहे. कोकणातील नाटय़कलावंतांना हक्काचा रंगमंच मिळावा म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच हौशी नाटय़संस्थांनी या एकांकिकेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय १५ हजार रुपये व तृतीय पारितोषिक १० हजार रुपये (प्रमाणपत्र व सन्मानचिन्हासोबत) आहे. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपूर्वी श्यामनाथ पुंडे (९८२१७५८१४७), अमोल खेर (९८२०१२३३३४९), स्मिता गांधी (९३२३४८९६९३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.