देशाच्या काही भागांत अद्याप निरक्षरता कायम आहे. देश रोकडरहित व्यवहारांसाठी सक्षम करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नात हा महत्त्वाचा अडथळा ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा विचार करून पनवेलमधील एका व्यापाऱ्याने रोकडरहित व्यवहार अंगवळणी पडावा यासाठी खेळातील एटीम आणि स्वाइप मशीन विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. या खेळांना लहानग्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहाशेजारी असणाऱ्या ‘सेलिब्रेशन’ या खेळण्याच्या दुकानात आठशे रुपये किमतीची एटीएम मशीन आणि एक हजार तीनशे रुपयाांचे स्वाइप मशीन विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
या मशिनीसोबत खेळण्यातीलच ५० हजार रुपयांचे कार्ड मुलांना मिळते. हे कार्ड म्हणजे सध्याचे डेबिट कार्ड आहे. अशी चार ते पाच कार्ड या ‘बिझनेस गेम’सोबत दिली जातात. मुलांनी खरेदी विक्री केल्यानंतर त्यांना पासवर्डवरूनच त्यांच्याजवळील चलनी नोटा खेळण्याच्या एटीएम मशीनमध्ये जमा करता येऊ शकतात. खेळण्यातील एटीएम मशीनमध्ये नोट आत खेचून घेते. या मशीनमधील पैसे काढण्यासाठी ‘पिन’ची गरज आहे. ही एटीएम मशीन घरातील गल्ल्यासारखी वापरता येऊ शकते.