दहावीत शिकवणीशिवाय ९४ टक्के; सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी दिलीप शिंदे यांचा मुलगा प्रथमेश शिंदे याने नावाप्रमाणेच दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवताना वाजेकर विद्यालयातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, हे यश त्याने कोणत्याही शिकवणीशिवाय मिळविले असून आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आणि निराधार व्यक्तींना विकासाची संधी मिळावी म्हणून ‘आयएएस’ होऊन काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे. आपल्या या प्रयत्नांना समाजाच्या सहकार्याची गरज आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
दिलीप शिंदे यांच्या गावाला १८ गुंठे जमीन आहे. त्यात आणखी दोन भावांचा वाटा. त्यामुळे मोलमजुरीशिवाय त्याच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. म्हणूनच पोटाची खळगी भरण्यासाठी शिंदे नवी मुंबईतील उरण येथे आले. दहावीपर्यंतचे जेमतेम शिक्षण असल्यामुळे त्यांनी रिक्षा चालविण्याचा पर्याय निवडला. त्यासाठी कर्जावर रिक्षादेखील घेतली. या कर्जाचा महिन्याला पाच हजारांचा हप्ता होता. शिवाय घराच्या भाडय़ासाठीचे २५०० रुपये, मुलांचे शिक्षण आणि इतर सर्व असे मिळून १५ हजारांत काहीच मुद्दल शिल्लक राहत नव्हते. अशाही स्थितीत त्यांनी त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली.
उरणच्या तु. ह. वाजेकर विद्यालयात शिकणारा त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश हा पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून गणला जातो. त्याने दहावीच्या परीक्षेतही तीच परंपरा कायम ठेवली आहे.
कबड्डीची आवड
प्रथमेशला कबड्डी खेळण्याची आवड आहे. यशस्वी होण्यासाठी बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे तो मानतो. सनदी अधिकारी होण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक असते आणि ते नियमित व्यायामातून साध्य करता येते यावर त्याचा विश्वास आहे.