चलनटंचाईची तीव्रता आज ना उद्या कमी होईल, अशा आशेवर आठवडाभर शांत राहिलेल्या नागरिकांनीही आता घरातले पैसे संपू लागल्यामुळे बँकांसमोर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक वाढतच जाणाऱ्या गर्दीचे नियमन करताना बँक कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यांच्यातील संतापाचा उद्रेक होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्नही बँकांकडून होत आहे.
[jwplayer ec77bxEN]




जुन्या नोटा खात्यावर जमा करण्यासाठी किंवा त्या बदलून घेण्यासाठी प्रत्येक बँकेसमोर रांगा लागत आहेत. वाढत्या रांगांच्या नियमनासाठी बँकांनी सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ केली आहे. बँकेच्या आत गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मोजक्याच ग्राहकांना आत सोडले जात असून अनावश्यक गर्दी टाळण्याचा प्रयत्न होत आहे. रांग लावलेल्या खातेदारांसाठी काही बँकांकडून बिस्किटे आणि पाणी वाटप केले जात आहे.
व्हीआयपी, जुने खातेदार यांना रांगेशिवाय पैसे दिले जात असल्यामुळे रांगेत उभ्या राहिलेल्या सामान्य खातेदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जी एटीएम केंद्रे सुरू आहेत तिथे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना रांग लावावी लागत आहे. पैसे येताच काही तासांत संपून जात असल्यामुळे ज्यांना रांग लावूनही पैसे मिळाले नाहीत, त्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागत आहे. काही बँकांच्या एटीएम केंद्रांचे शटर अजूनही बंदच ठेवण्यात आले आहे. एटीएममधून जास्तीत जास्त २५००रुपयेच मिळत आहेत. अधिक पैशांचे व्यवहार धनादेशाद्वारे किंवा ऑनलाइन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे पैसे असूनही ते वापरता येत नाहीत, अशी अवस्था सर्वत्र दिसत आहे.
[jwplayer ZNDAJZYe-1o30kmL6]