पालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित

राज्य शासनाच्या अर्थसाहाय्यावर उभ्या राहणाऱ्या अमृत योजनेसारख्या काही प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले आहे, मात्र त्यांनी अद्याप वेळ न दिल्याने एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण लोकसभा निवडणुकीअगोदर आटपून घेतले जाणार आहे. नवी मुंबईत सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पालिका आयुक्त असा वाद रंगला असून गेली अनेक वर्षे सत्ताधारी पक्षाचे सूत्रधार माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणाऱ्या प्रकल्प लोर्कापण सोहळ्याला प्रथमच पर्याय निवडला जाणार आहे.

नवी मुंबई पालिका प्रशासनाने एक हजार ७०० कोटीपेक्षा जास्त नागरी कामांचा सपाटा लावला आहे. तरीही नगरसेवकांनी कामे होत नसल्याची बोंब ठोकण्यास सुरुवात केली आहे. शहराला आवश्यक असलेली कामे प्रशासनाने हाती घेतली असून अनावश्यक कामांना फाटा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विरुद्ध आयुक्त डॉ. रामास्वामी असा एक सामना सभागृहात व सभागृहाबाहेर सुरू झाला आहे. सभागृहातील सामन्याची धुरा सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यावर सोपविण्यात आली आहे, तर सभागृहाबाहेर जाहीर सभेत पक्षाचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी आयुक्तांवर तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाराजीची ही दरी अधिक वाढू लागली असून हा वाद अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई पालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील मोठय़ा प्रकल्पांचे लोकार्पण केले जात आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथील प्रमुख माजी मंत्री नाईक यांच्या हस्ते प्रकल्पांचा शुभारंभ अथवा उद्घाटन करण्याची प्रथा आहे. नगरसेवकांनी प्रभागात घेतलेल्या छोटय़ामोठय़ा नागरी कामाव्यतिरिक्त प्रशासनाकडून मोठय़ा प्रकल्पाचे लोकार्पण गेल्या चार वर्षांत झालेले नाही. राज्य व केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत पालिकेने घणसोली, सानपाडा आणि नेरुळ येथे हरितपट्टे तयार केले आहेत. नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाच्या जवळील हरित पट्टा अनेकांच्या आर्कषणाचा बिंदू ठरला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या महिलांना महिलांसाठी चालविलेल्या तेजस्विनी बसेसचा शुभारंभ अद्याप झालेला नाही. ह्य़ा बसेस गेला एक महिना तुर्भे येथील आगारात उद्धाटनाचा मुहूर्त शोधत आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक मदतीवर उभे राहणारे हे प्रकल्प लोकार्पण करण्यासाठी पालिका प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले आहे, मात्र त्यांनी अद्याप वेळ दिली नसल्याने हा सोहळा एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या उपस्थितीत आटोपून घेतला जाणार आहे.

कटूता वाढणार

राज्य शासनाच्या अर्थसाह्य़ावरील प्रकल्पासाठी मुख्यमंत्री किंवा एखादा कॅबिनेट मंत्री आमंत्रित करण्याचा पायंडा आहे. या महिन्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुका लागणार असल्याने ही उद्घाटने केली जाणार आहेत. त्यासाठी कॅबिनेट मंत्री येणार असल्याने माजी मंत्री गणेश नाईक यांना आमंत्रित करण्याचा प्रश्न येणार नाही. पालिकेत सुरू असलेल्या आयुक्त सत्ताधारी पक्षाच्या वादात ही एक आणखी ठिणगी पडणार आहे. नाईक यांनी जाहीररीत्या पालिका आयुक्तांना धोंडा अर्थात दगड अशा शब्दात अवहेलना केली आहे. त्यामुळे ही कटुता वाढणार असून वाद पेटणार आहे.