नवी मुंबई : पनवेलचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांना त्यांच्या कार्यकाळात पाठिंबा देणाऱ्या कफ (सिटिझन युनिटी फोरम) स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अरुण भिसे यांना भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी धमकी दिल्यासंदर्भातील तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे भिसे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार होता, मात्र त्यांनी नंतर नाकारल्याची माहिती दिली.

पनवेल पालिकेचे माजी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या विरोधात पनवेल पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. हा ठराव राज्य शासनाने निलंबित केला होता, मात्र त्यानंतर अल्पावधीतच शिंदे यांची बदली करण्यात आली. ही बदली रद्द करण्यात यावी यासाठी पनेवलमधील काही सामाजिक संघटना प्रयत्न करीत आहेत. कफने बदली हा प्रशासकीय भाग असल्याने ती स्वीकारली आहे, बदली रद्द करण्याच्या चळवळीत भाग घेतलेला नाही. तरीही परेश ठाकूर यांनी संस्थेचे अध्यक्ष अरुण भिसे यांना ‘काका, तुमच्या जिवाला धोका आहे. तुमच्यावर हल्ला देखील होऊ शकतो,’ अशी धमकी दिल्याचे समजते.

कफ ही एक सामाजिक संस्था आहे. पनवेलकरांच्या हितासाठी ती कार्यरत आहे. आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. माजी आयुक्त आणि प्रशासनाने जुळवून घेण्याची आवश्यकता होती. त्यांची बदली अविश्वासाच्या ठरावामुळे झालेली नाही. इतर प्रशासकीय बदल्यांमध्ये सरकारने ती केली आहे. नवीन आयुक्तांना संधी देण्याची गैरज आहे.

– अरुण भिसे, अध्यक्ष, कफ