बीएमडब्ल्यू कारमधून उच्चभ्रू वस्तींमध्ये घरफोडय़ा
बीएमडब्ल्यू कार एखाद्या उच्चभ्रू वस्तीतील गृहसंकुलाच्या आवारात प्रवेश करते. कारमधून डोक्यावर पांढऱ्या रंगाची ‘हॅट’, एखाद्या साहेबाला शोभेल असा गणवेश घातलेली व्यक्ती उतरते. लगोलग त्याच्यामागून उतरलेले दोन साहाय्यक त्याच्या हातातील बॅगा स्वत:कडे घेतात. प्रवेशद्वारावर उभा असलेला सुरक्षारक्षकही हे सारे पाहून त्याच्या चौकशीऐवजी कडक सलाम ठोकतो. मग तिघांची स्वारी गृहसंकुलातील आलिशान सदनिकांमध्ये प्रवेश करते आणि काही वेळाने त्याच थाटात तिघे संकुलाबाहेर पडतात. काही दिवसांनी याच प्रवेशद्वारातून पोलीस आत प्रवेश करतात. या वेळी मात्र सुरक्षारक्षकाला कडक सलाम ठोकावाच लागतो; पण पोलीस चौकशीचा हिसका सहन करूनच. संकुलातील सदनिकेत चोरी झालेली असते आणि ही चोरी त्या दिवशी आलेल्या ‘सायबा’ने केलेली असते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा पद्धतीने घरफोडय़ा करणाऱ्या चोराला नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी २० दिवसांपूर्वी दिल्ली येथून ताब्यात घेतले. या वेळी त्याच्याकडून चोरीची ‘मोडस् ऑपरेंडी’ माहिती काढण्यात आली. याचवेळी काही किलो सोनेही जप्त करण्यात आले.
नदीम कुरेशी असे संशयित आरोपीचे नाव आहे. चोरटय़ाच्या नावावर खारघर येथे मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
महागडय़ा गाडय़ांतून फिरणे आणि उंची राहणीमानाचा देखावा करून समोरील व्यक्तींवर छाप पाडणे असे या नदीम आणि त्याच्या साथीदारांचे काम आहे. नदीम आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल शंभराहून अधिक घरफोडय़ा उच्चभ्रूंच्या वस्तीत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सराईत चोरांना पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हालचालींवरून ओळखतात. मात्र या चोरांना ओळखण्यासाठी पोलिसांना मोठय़ा गृहसंकुलातील चोरी प्रकरणातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणातील साम्य तपासावे लागले. अशाच एका चोरी प्रकरणातील शोध घेताना संबंधित गृहसंकुलातील सीसीटीव्ही फूटेजवरून नदीम व त्याच्या साथीदारांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली.
चोरीच्या घटनेनंतर संशयितांना विविध राज्यातून शोधून काढण्यासाठी कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाला वेळोवेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन व उपायुक्त शहाजी उमप यांचे मार्गदर्शन मिळाले. पथकाने नदीमची माहिती मिळविण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदनिकांची रेकी
नदीमला मागील महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समजताच नवी मुंबईच्या पोलिसांनी त्याचा ताबा मिळवला. त्यानंतर नवी मुंबईसह इतर ठिकाणच्या घरफोडय़ांना वाचा फुटली. नदीमची खारघरमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघड झाले. नदीमने देशभरात विविध ठिकाणी घरफोडय़ांचे सत्र सुरू ठेवले होते. गृहसंकुलात बीएमडब्ल्यू गाडी असल्यामुळे त्याला सहज प्रवेश मिळत होता. त्यानंतर नदीम व त्याचा सहकारी इमारतीत जाऊन रेकी करत असे. त्यानंतर तो इमारतीत पुन्हा रिकाम्या बॅगा घेऊन जात असे.

More Stories onचोरीRobbery
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmw car used for robbery in elites colony
First published on: 22-04-2016 at 03:34 IST