नवी मुंबई : नौदलात अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीस वाशी पोलिसांनी अटक केली आहे. स्वस्तात वस्तू घेऊन देतो सांगत लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. हा तोतया प्रत्यक्षात बारावी पास आहे.

मनीष अरिसेरा असे अटक आरोपीचे नाव आहे. तो शिरवणे गावात राहत आहे. नौदलात अधिकारी असल्याचे भासवत होता. गणवेश परिधान करूनही तो वावरत असे. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि इंग्रजीवर प्रभुत्व असल्याने त्याची छाप पडत होती. याचाच गैरफायदा घेत त्याने अनेकांना लॅपटॉप, मोबाइल यासह सोने-चांदीचे दागिने कमी किमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. आलेल्या तक्रारींनुसार ७ लाख ३२ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी त्याच्यावर पाळत ठेवत त्याला अटक केली. झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट ओळखपत्र, रक्षा मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र, नौदलाचे बनावट नोकरी पत्र, तसेच इतर बनावट कागदपत्रे सापडली आहेत. आरोपीला २०१६ मध्येही एनआरआय पोलिसांनी अटक केली होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.