दिघ्यातील ९४ अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेली कारवाई सध्या उत्सवी काळामुळे थांबविण्यात आली असून ती १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. या बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेवक नवीन गवते व त्याचा भाऊ  राजेश गवते यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ब्रिजेश मिश्रा यांनी गवते बंधूंविरोधात तक्रार दाखल केली आहे. नवीन गवतेने मोरेश्वर अपार्टमेंटचे बनावट पेपर बनवून नागरिकांना सदनिका विकल्या, तर राजेश गवतेने शिमग्या अपार्टमेंटचे बनावट पेपर बनवून सदनिका विकल्याची तक्रार ब्रिजेश मिश्रा यांनी केली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत पाच बांधकाम व्यावसायिक व एका एजंटला अटक केली आहे.

 

कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्यास अटक

कामगारांच्या बोनसची रक्कम व भेटवस्तू चोरणाऱ्याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून या चोरटय़ाकडून ५५ हजार रुपयांची रक्कम व सोने-चांदीच्या शिक्क्यांचा ऐवज जप्त केला आहे. नारायण रेड्डी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

रबाळे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी काही कंपन्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे बसविले होते. यापैकी एका कॅमेरात एक संशयास्पद व्यक्ती आढळून आली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक अविनाश माने यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. सराईत गुन्हेगारांची चौकशी करीत असताना त्यांना उल्हासनगरला राहणाऱ्या नारायण रेड्डी याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ांची कबुली दिली असून त्याच्याकडून ५५ हजार रुपयांची रोकड, चांदीचे ९ शिक्के व सोन्याची ४ नाणी असा ऐवज जप्त करण्यात आला.

 

वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावावी यासाठी वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणऱ्या ८५३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ही विशेष मोहीम झाली. या कारवाईसाठी चार पथके स्थापन करण्यात आली होती. यात हेल्मेट न वापरणाऱ्या ७३४, ट्रिपल सीट गाडी चालवणाऱ्या ८०, वाहन परवाना जवळ न बाळगणाऱ्या तीन, कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या १२, परवाना नसताना गाडी चालवणाऱ्या २० व वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणाऱ्या चार अशा एकूण ८५३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

 

नायजेरियन नागरिकांना अटक

अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १ लाख ६८ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

वाशी येथील सपना लॉजच्या मागे असणाऱ्या कमल निवास इमारतीच्या गच्चीवर काही नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून ९ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अमली पदार्थासह २१ मोबाइल फोन, १टॅब, १ इंटरनेट डोंगल, २ लॅपटॉप आदी वस्तू हस्तगत केल्या.

यापैकी चौघांकडे पारपत्र व व्हिसा नसल्याचेही उघड झाले. वाशी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दिघ्यातील ९४ अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेली कारवाई सध्या उत्सवी काळामुळे थांबविण्यात आली असून ती १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. या बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेवक नवीन गवते व त्याचा भाऊ  राजेश गवते यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी ब्रिजेश मिश्रा यांनी गवते बंधूंविरोधात तक्रार दाखल केली आहे. नवीन गवतेने मोरेश्वर अपार्टमेंटचे बनावट पेपर बनवून नागरिकांना सदनिका विकल्या, तर राजेश गवतेने शिमग्या अपार्टमेंटचे बनावट पेपर बनवून सदनिका विकल्याची तक्रार ब्रिजेश मिश्रा यांनी केली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत पाच बांधकाम व्यावसायिक व एका एजंटला अटक केली आहे.

 

पनवेलमध्ये मोटारीतून रोकड व शस्त्रचोरी

बंद मोटारीमधून सात लाख रुपयांची रोकड आणि बंदुकीसह काडतुसे ठेवलेली बॅग चोरीला गेल्याची घटना पनवेलमध्ये गेल्या आठवडय़ात घडली.

खोपोली येथे राहणारे अस्लम खान हे शुक्रवारी पनवेलमधील आपल्या सनदी लेखापालाच्या (सीए) भेटीसाठी आले होते. मोटार रस्त्यावर उभी करून ते प्रथम नमाज पठण करण्यासाठी याकूब बेग ट्रस्टच्या मशिदीमध्ये आणि नंतर जेवणासाठी हॉटेलात गेले. या वेळी चोरटय़ांनी अस्लम यांच्या मोटारीतून रोकड असलेली बॅग पळवली. या बॅगमध्ये सात लाख रुपयांची रोकड होती, चोरटय़ांनी या गाडीतील बंदूक व काडतुसेही चोरली.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर या प्रकरणाचा तपास करीत असून त्यांना सीसीटीव्हीचे फुटेजही मिळाले आहे. चोरांनी पाळत ठेवून ही चोरी केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.