कळंबोलीतील स्मशानभूमीत गळक्या छतांखाली अंत्यसंस्कार
पनवेल : सिडकोने प्रत्येक वसाहत निर्माण करताना तेथील लोकसंख्येच्या तुलनेत स्वतंत्र स्मशानभूमी उभ्या केल्या. मात्र, त्यांची अवस्था पुढे जाऊन कशी होईल, याचा विचार करण्याची जरादेखील तसदी घेतली नसल्याचे चित्र सध्या आहे. कळंबोलीतील स्मशानभूमी हे त्यातील एक उदाहरण. नात्यातील एखाद्याच्या अंत्यविधीसाठी कळंबोलीतील या स्मशानभूमीत येणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया ‘गैरसोयींचे आगर’ अशीच असते. या स्मशानभूमीत मृताच्या नातेवाईकांना पावसाच्या धारा झेलत अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेतच, पण चितेवर रचली जाणारी लाकडेही धो-धो कोसळणाऱ्या पावसात भिजत आहेत. त्यामुळे ती पेटच घेत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
गेली अनेक वर्षे स्मशानभूमीच्या छताची दुरुस्ती सिडकोने केलेली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला. सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची निगा राखण्याचे धोरण सिडकोने जाहीर केले होते. मात्र, ते आजवर अमलात आलेले नाही. त्यासाठी एकाही सिडको अधिकाऱ्याने येथील सामाजिक संस्थांना विचारलेले नाही.
स्मशानभूमीत नातेवाईकांसाठी एक खोली आणि लाकडांसाठी दुसरी खोली आहे. एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोय व्हावी यासाठी लोखंडी सरणखांब उभारण्यात आले आहेत. त्यावर पत्र्याचे छत आहे. गेली पाच वर्षे सरणखांबांवरील छताची दुरवस्था झाली आहे. इतर दिवसांत एकवेळ अंत्यविधी करण्यात काही अडथळे निर्माण होत नाहीत. परंतु, पावसाळ्यात मृतदेहाची विटंबना होईल की काय, अशी स्थिती ओढावते. गेले काही दिवस मुसळधार पावसात काही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पावसाची झड पत्र्यांमधून चितेजवळ आली. एकाच्या तर चितेवर पावसाचे पाण्याच्या धारा लागल्या आणि ती विझली. त्यामुळे अनेकदा डिझेलचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे एकाने सांगितले.