नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील सीफी टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीकडून पावसाळय़ात त्यांच्या कंपनीमध्ये जाणारे पाणी अडविण्यासाठी बेकायदा पद्धतीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या पावसाळय़ात नाल्याशेजारी असलेल्या आदिवासी पाडय़ाला पुराचा धोका आहे. याबाबत त्या ठिकाणीच्या इतर शेतमजमीन धारकांकडून तक्रार करून देखील कुठलीही कारवाई न करता उलट तक्रारदारालाच कंपनी व्यवस्थापनाकडून धमकावले जात आहे, असा आरोप शेतजमीनधारक विनायक शिवराम झगडे यांनी केला आहे.
मागील काही वर्षांत नवी मुंबई शहरात पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर अतिक्रमण होत असल्याने पावसाळय़ात नवी मुंबई शहरात पाणी भरण्याच्या घटनांत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात एमआयडीसी भाग आघाडीवर आहे. या भागात होणारे अवैध बांधकामामुळे पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे.
आता रबाळे एमआयडीसी भागात सीफी टेकक्नॉलॉजी या आयटी कंपनीद्वारे बेकायदा पद्धतीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत विनायक झगडे यांनी एमआयडीसीकडे तक्रार केली आहे. मात्र यावर कुठलीही कारवाई होत नाही. या नाल्याशेजारी झगडे यांची भात शेती आहे. तसेच आदिवासी वस्तीही आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून तक्रारदारालाच दमदाटी केली जात आहे.
याबाबत नवी मुंबई पोलीस देखील सहकार्य करीत नसल्याचा आरोप झगडे यांनी केला आहे. तर सदर नाल्यातून डोंगरावरुन येणारे पाणी वाहून जाते. या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात बदल केला तर आजूबाजूच्या नागरीवस्तीत पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी झगडे यांनी केली आहे.
रबाळे एमआयडीसीतील सीफी टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये पावसाळय़ात पाणी शिरते. कंपनीमध्ये डोंगरातील पाणी येते. त्यामुळे या कंपनीकडून कोणतीही परवानगी न घेता अवैधरीत्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. याबाबत एमआयडीसीला तक्रार करून ही कोणाला न जुमानता काम सुरू आहे. या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदला तर पावसाळय़ात येथील नागरिक वस्तीत पाण्याचा पुराचा धोका उद्भवेल.- विनायक शिवराम झगडे, शेतजमीन तक्रारदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित कंपनीला काम थांबविण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. सोमवापर्यंत हे खोदकाम पाडण्यात येईल. – एस एस गित्ते, उपअभियंता, राबळे एमआयडीसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change flow natural private company risk of flood monsoon rabale mid amy
First published on: 21-05-2022 at 00:54 IST