मनपसंत योजनेतील घरांची सोडत

पनवेल, खारघर आणि उलवा येथील गृहनिर्माण योजनेत विक्री न झालेल्या आरक्षित प्रवर्गासाठीच्या घरांच्या विक्रीसाठी सिडकोने सुरू केलेल्या मनपसंत योजनेची सोडत मंगळवारी काढण्यात आली. त्यातही ग्राहक न मिळाल्याने ३८० घरांपैकी १३४ घरे शिल्लक राहिली आहेत. यात व्हॅलीशिल्प या गृहसंकुलातील उच्च उत्पन्न गटातील ८६ व मध्यम उत्पन्न गटातील ४८ घरे शिल्लक आहेत. त्यामुळे सिडकोला या घरांची पुन्हा जाहिरात करून ग्राहकांना आमंत्रित करावे लागणार आहे. त्यानंतरही ते आरक्षित ग्राहक प्राप्त न झाल्यास सिडको संचालक मंडळाच्या संमतीने ही घरे सर्वसामान्य ग्राहकांना विकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिडकोने काही वर्षांपूर्वी बांधलेल्या सेलिब्रेशन, वास्तुविहार, उन्नती आणि व्हॅलीशिल्प या गृहसंकुलांतील ३८० घरे विक्रीविना शिल्लक राहिली होती. ही घरे अपंग, प्रकल्पग्रस्त, पत्रकार, सरकारी अधिकारी, भटक्या जाती, जमाती अशा ३९ पैकी ११ संवर्गातील आहेत. त्यामुळे त्यांना त्या संवर्गातील ग्राहक न मिळाल्याने ही घरे विक्रीविना होती. सिडकोने दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांची विक्री करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ३८० घरांसाठी सहा हजार मागणी अर्ज आले होते. त्यांची पात्रता तपासल्यानंतर या घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. त्यातील २४६ ग्राहकांना मनपसंत योजनेतील घरे मिळाली आहेत. या योजनेत कमीत कमी १४ लाख तर जास्तीत जास्त १ कोटी ४३ लाख रुपये किमतीची घरे होती. महागडय़ा घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने या संवर्गातील व्हॅलीशिल्प येथील ११० घरांपैकी केवळ १४ घरे विकली गेली तर याच संकुलातील मध्यम उत्पन्न गटातील १०१ घरांपैकी केवळ ५३ घरे विकली गेली. या घरांची किंमत ५० लाखांच्या वर आहे. त्यामुळे अनेकदा सर्वेक्षण करून शोधून काढण्यात आलेल्या ३८० घरांपैकी केवळ २४६ घरे विकली गेली आहेत. १३४ घरे विक्रीविना राहिली आहेत. ही घरे त्या संवर्गातील ग्राहकांसाठी आरक्षित असल्याने सिडकोला पुन्हा सोडत काढावी लागणार आहे.

नावे जाहीर करण्याची मागणी

सिडकोच्या मनपसंत योजनेसाठी आज बेलापूर येथील मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यासाठी पाच विविध क्षेत्रांतील मान्यवर पर्यवेक्षक नेमण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या सीड क्रमांकानुसार सोडत काढली जात होती. ३८० घरांसाठी ही सोडत काढल्यानंतर ज्यांना घरे मिळाली आहेत. त्यांची नावे तसेच प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांची नावे वाचून न दाखविल्यामुळे उपस्थित ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सिडकोच्या पणन विभागाने ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार प्रतीक्षा यादी तसेच भाग्यवंतांची नावे मोठय़ा पडद्यावर जाहीर केली. त्यामुळे निर्माण झालेली नाराजी नंतर शांत झाली.

 

ही घरे शिल्लक

खारघर व्हॅलीशिल्प

सेक्टर ३६

८६ उच्च उत्पन्न गटातील

४८ मध्यम उत्पन्न गटातील