नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या योजनेच्या पूर्ततेत खारीचा वाटा उचलणाऱ्या सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेस उशिरा का होईना ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला आहे.

परिवहन आधारित संकुलामध्ये सिडकोच्या मालमत्ता असलेल्या रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनतळ, बस स्थानके, ट्रक टर्मिनल्स या ठिकाणी सिडको महागृहनिर्मितीतील घरे बांधणार आहे. या बांधकामांना यापूर्वीच काही संस्थांनी विरोध दर्शविला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. या संदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवून सद्य:स्थिती स्पष्ट करणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत सर्वासाठी घरे या योजनेकरिता राज्य सरकार म्हाडा व सिडकोच्या माध्यमातून पाच लाख घरे बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.  एक वर्षापूर्वी केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असल्याने या कामाला वेग आला होता. सिडकोने तर थेट दोन लाख घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र आता ही संख्या अध्र्यावर आणण्यात आली आहे. साडेबारा टक्के योजनेतील अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्याप भूखंड देणे शिल्लक असल्याने सिडकोकडे जमिनीचा तुटवडा आहे. त्यामुळे महागृहनिर्मितीसाठी सिडकोकडे विस्तीर्ण अशी मोकळी जमीन नाही. दोन लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोने त्यांच्या ताब्यात असलेली रेल्वे स्थानक, बस आगार, ट्रक टर्मिनल यांच्या जवळील जमीन या महागृहनिर्मितीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलातील दोन मजले वाहनतळांसाठी राखीव ठेवून इतर सर्व मजल्यांवर परवडणारी तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्याची ही संकल्पना आहे. सिडकोने यातील २४ हजार घरांचे काम सुरू केले आहे. नवी मुंबईच्या दक्षिण भागात या घरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील अनेक लोकप्रतिनिधींनी विरोध केला असून नाईक यांचे खंदे समर्थक माजी महापौर जयवंत सुतार यांनीही या योजनेला विरोध केला आहे. सार्वजनिक वाहतूक स्थानकांच्या बाहेर उभारण्यात येणाऱ्या या संकुलामुळे वाहनतळ तसेच वाहतूक कोंडीची मोठी समस्या उभी राहणार असून शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडणार आहे. त्यामुळे सिडकोच्या या पंतप्रधान आवास योजनेतील घरांना विरोध केला जात आहे. आता  भाजपाचे आमदार नाईक यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन विरोध केला आहे. यासंदर्भात आपण मोदी आणि फडणवीस यांना पत्र लिहून लोकांच्या भावना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.