आघाडीची एकगठ्ठा माथाडी मते चुचकारण्याचा महायुतीचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माथाडी कामगारांचे स्वर्गीय नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने नवी मुंबईत चौथ्यांदा आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माथाडी कामगारांच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची एकगठ्ठा मतदार (व्होट बँक) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथाडी कामगारांना अनेक आश्वासने देऊन चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

राज्यातील विविध भागांतून विशेषत: पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत गेली पन्नास वर्षे स्थिरावलेला माथाडी कामगार हा अगोदर काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ‘व्होट बँक’ म्हणून राज्यात ओळखला जातो. त्यामुळे या कामगार चळवळीतील शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील या दोन नेत्यांना राष्ट्रवादीने आमदारकी बहाल केली. त्यातील शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषद देऊन आमदार बनविले होते. त्या जोरावर पाटील सध्या महायुतीच्या तंबूत घुसलेले आहेत. माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याबरोबर जवळीक केलेल्या पाटील यांच्या पदरात अलीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद पडलेले आहे. भाजपबरोबर घरोबा सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी शेवटच्या क्षणी थेट शिवसेनेबरोबर पाट लावून सातारा लोकसभा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी स्वर्गीय वडील अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती व माथाडी कामगार कायद्याला पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले. आतापर्यंत मातोश्रीवरील एकाही नेत्याची या कार्यक्रमाला यापूर्वी हजेरी लागलेली नव्हती, पण पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मंगळवारी दस्तरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुर्भे येथील कांदा-बटाटा बाजारात आले होते. उशिरा आल्याबद्दल त्यांनी चक्क मुख्यमंत्र्याची माफी मागितली. त्याच वेळी युतीची बोलणी शांतपणे अंतिम टप्प्यात सुरू असल्याची कुणकुण लागली. दोन्ही पक्षातील बंडखोरी टाळता यावी यासाठी अर्ज भरण्याच्या दिवशी ही महायुती जाहीर करण्याची चर्चा या वेळी सुरू होती. राजशिष्टाचार बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्या पूर्वी भाषण करून महायुतीच्या नेत्याला शेवटच्या भाषणाचा मान दिला. या दोन्ही नेत्यांनी माथाडी कामगारांना नजरेसमोर ठेवून दिलेली आश्वासने ही पश्चिम महाराष्ट्रातील ही अभेद राष्ट्रवादीचे हे मतदार फोडण्याचे पद्धतशीर प्रयत्न असल्याचे दिसून आले. माथाडी कामगारांची सर्मथ व भक्कम अशी चळवळ उभी राहिली असून त्यांचे सर्व श्रेय स्वर्गीय अणासाहेब पाटील यांना जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी मराठा आरक्षणाचे प्रणते हे अण्णासाहेब पाटील असल्याचे सूतोवाच करून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे श्रेय लाटणाऱ्यांमध्ये ठिणगी टाकली. माथाडी कामगार कायदा यशस्वी राबविणाऱ्या सर्व कामगारांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. पन्नास वर्षे टिकणारा हा एकमेव कायदा असून निती आयोग या कायद्याचा अभ्यास करीत असून तो देशभर राबविला जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगार कायद्याचे महत्त्व सांगितले. वडाळा येथील माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यात आला असून सिडकोतही माथाडी कामगारांसाठी घरे असल्याचे सांगत पंधप्रधान आवास योजनेतील फायदा ही घरे घेणाऱ्या सर्व माथाडींना दिला जाईल, असे सांगितले.

ही चळवळ शंभर वर्षे टिकली पाहिजे असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांच्या हिताच्या आणखी चार कामे करण्याची तयारी दर्शवली. याच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फटकेबाजी केली. ‘लढवय्या वडिलांचा लढवय्या मुलगा’ असे नरेंद्र पाटील यांचे कौतुक करून पाटील यांना खासदार करणारच असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. त्यामुळे फडणवीस ठाकरे या महायुतीच्या नेत्यांनी माथाडी कामगारांच्या अपेक्षा उंचावून त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत होते.

तुमच्या हक्काचे सरकार आले पाहिजे!

अण्णासाहेब पाटील आणि बाळासाहेब पाटील यांची युती झाली होती. पाटील यांचे अकाली निधन झाले नसते तर या राज्यात पहिला माथाडी कामगार मुख्यमंत्री झाला असता असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी माथाडी कामगारांच्या भावनेला हात घातला. सरकारच्या अपेक्षांची ओझी न वाहता तुमच्या हक्काचे सरकार आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून इतरांचे इमले बांधण्यासाठी हातभार लावणाऱ्या माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटणार, असे आश्वासन दिले.

नेहमीच माथाडी चळवळीत कामगारांच्या पाठीशी उभे राहू. माथाडींच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न सुटला असून, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माथाडींनादेखील घरे उपलब्ध करून देण्यात येतील.– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 मी गिरणी कामगारांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे कामगारांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. माथाडी कामगार यांना किमान वेतन व स्वत:ची घरे उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करीन. – चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis shiv sena akp
First published on: 26-09-2019 at 01:50 IST