नवी मुंबई : मंगळवारी वाशी खाडीत आढळलेला मृतदेह नेरुळ येथून बेपत्ता झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. सडलेल्या अवस्थेतील हा मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे.

मिहिर मिश्रा (वय १७) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मिहिर गुरुवारपासून बेपत्ता होता. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मिहिरचे वडील उपकारानंद मिश्रा शासकीय सेवेत आहेत. ते मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल परिसरात राहतात. मिहिर गुरुवारी नेहमीप्रमाणे नेरुळ येथील शाळेतून दुपारी २.३० वाजता निघाला. त्यानंतर तो अ‍ॅन्टॉप हिल येथील घरी पोहोचलाच नव्हता.

गुरुवारी तो नेरुळ रेल्वे स्थानक, तसेच वाशी रेल्वे स्थानकावरही आढळल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. मिहिरने त्याच्या वडिलांना पाठवलेल्या संदेशात ‘तुम्ही सर्वानी स्वत:ची काळजी घ्या’ असे म्हटले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. नेरुळ पोलीस ठाण्यात मिहिर हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन राणे आणि त्यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला होता.

वाशी खाडीतून पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मिहिरच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. या वेळी त्याच्या वडिलांनी मृतदेहावरील खुणांवरून तो मिहिर असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.