गृह अलगीकरणातील रुग्णांची प्रकृती अचानक अत्यवस्थ

नवी मुंबई</strong> : गंभीर लक्षणे नसल्याने घरातच अलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना अचानक प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करावे लागत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असलेल्या करोनाबाधितांची संख्या जास्त आहे.

वाशी येथील एका ८० वर्षीय महिलेला गृह अलगीकरणात न राहण्याचा सल्ला दिलेला असताना नातेवाईकांनी घरीच ठेवून घेतले आणि दोन दिवसांनी या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर खासगी किंवा पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी शोधाशोध सुरू झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे.

नवी मुंबईत दररोज सरासरी एक हजार करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यातील ७० टक्के रुग्णांना फारशी लक्षणे आढळून येत नसल्याने गृह अलगीकरणात ठेवण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिला जात आहे, मात्र यातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांना जवळच्या कोविड काळजी केंद्र अथवा रुग्णालयात हलविले जात आहे. आर्थिक क्षमता आणि मेडिक्लेम असल्याने यातील अनेक रुग्ण हे खासगी रुग्णालयांना पसंती देत आहेत, मात्र शहरातील बहुतांशी सर्व विशेष सुविधा असलेली रुग्णालये रुग्णांनी भरून गेलेली आहेत. त्यामुळे काही रुग्णांना दुय्यम व तृतीय श्रेणीतील खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यांचा पालिकेच्या रुग्णालयांवर भरवसा नसल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई पालिकेने शहरात जास्तीत जास्त काळजी केंद्रे व खासगी रुग्णालयांच्या साह्य़ाने ऑक्सिजन, अतिदक्षता व प्राणवायू रुग्णशय्या उभारण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सुमारे १६ खासगी रुग्णालयांत कोविड उपचार व्यवस्था करण्यात आली असून यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी असलेली अतिदक्षता विभाग व्यवस्था व्यापून गेली आहे. यात शहराबाहेरील पन्नास टक्के रुग्णांचा भरणा असून खासगी रुग्णालयांनी या रुग्णांना सामावून घेतले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के रुग्णशय्येवर पालिकेचे नियंत्रण राहील असा आदेश जारी केला आहे. त्यामुळे यानंतर ८० टक्के रुग्णशय्या ह्य़ा पालिकेच्या वतीने नियंत्रित केल्या जाणार आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी खासगी व पालिकेच्या ७७५ रुग्णशय्या तयार केल्या जात असून यातील ५०५ रुग्णशय्या सध्या तयार आहेत.

खासगी रुग्णालयांवर लक्ष

पालिकेच्या कॉल सेंटर व हेल्पलाइनवर अतिदक्षता तसेच साध्या रुग्णशय्यांसाठी प्रतीक्षा यादी आहे. या प्रतीक्षा यादीतील रुग्णांना यानंतर पालिका खासगी रुग्णालयात दाखल करून घेणार आहे. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयावर आयुक्तांनी एक नोडल अधिकारी नेमला असून स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर या अतिदक्षता विभागातील रुग्णशय्यांवर लक्ष ठेवून आहेत. खासगी रुग्णालये रुग्णाचे बिल वाढविण्यासाठी अतिदक्षता विभागातील त्या रुग्णाचा मुक्काम वाढवीत असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागावर पालिकेच्या आरोग्य पथकाचे यानंतर बारीक लक्ष राहणार आहे.