नवी मुंबईत घडलेली मारहाण, अनधिकृत बांधकामे, आत्महत्या, शैक्षणिक माहितींची लपवाछपवी आदी प्रकरणांमुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही विद्यमान नगरसेवकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणांमुळे त्यांच्या पाच ते सहा जणांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये सत्ता स्थापनेसाठी मदत घेतलेल्या दहा काँग्रेस नगरसेवकांचा भाव चांगलाच वधारला आहे.
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत न देता काठावर पास केले आहे. ११० नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ५२ नगरसेवक निवडून आले आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यान चार अपक्ष व दहा काँग्रेसच्या नगरसेवकांची आघाडी स्थापन करून त्यांच्यावर सत्ता स्थापन करण्याची वेळ आली. अगोदरच काठावर पास असलेल्या राष्ट्रवादीला आता एकामागून एक धक्के बसत आहेत. त्यातील पहिला धक्का नेरुळच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या एका नगरसेवकाने कमी झाली आहे. याच नेरुळमध्ये आठ वर्षांपूर्वी अकाली निधन झालेल्या रामचंद्र पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या जागी काँग्रेसचे नामदेव भगत निवडून आले होते. त्यामुळे मालादी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगरसेवक निवडून येईल याची कोणतीही हमी देता येत नाही. मालादी यांच्या मृत्यूनंतर दिघा येथील ९९ अनधिकृत इमारतींपैकी पहिल्या चार इमारतींच्या बांधकाम प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नवीन गवते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक झाल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. दिघा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हवी तशी साथ न दिल्याने हे गवते दांम्पत्य शिवसेनेच्या गडात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्या फुटीची चर्चा सध्या सुरू आहे. याच भागातील संगीता यादव ही माहिला नगरसेविका जात पडताळणीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता असल्याने तिचे नगरसेवकपदही दावणीला लागले आहे. वाशी येथील वैभव गायकवाड यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांनी त्यांच्या शैक्षणिक माहिती लपविण्याच्या विषयावरून न्यायालयात दाद मागितली आहे. याशिवाय कोपरखैरणे व नेरुळ येथील दोन नगरसेवक जातीच्या प्रमाणपत्राच्या चक्रव्युहात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ सर्वात जास्त जागाजिंकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील नेते गणेश नाईक यांनी भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ही पडझड लक्षात घेऊन काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा दूरदृष्टी निर्णय घेतला आहे. अपक्षाच्या साथीने बहुमत तयार होत असताना काँग्रेसचे दहा नगरसेवक सोबत घेऊन त्यांना सत्तेतील अर्धा वाटा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या अशा अडचणींमुळे या काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाव मात्र, आता वधारला आहे.

कंत्राटी कामांमध्येही हिस्सेदारी
पालिकेतील सत्तेसाठी उपमहापौरपद आणि पाच विषय समित्या अशा तडजोडीवर एप्रिल महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाली आहे. त्यामुळे पालिकेत काँग्रेस दहा नगरसेवकांच्या बळावर अर्धी वाटेकरी झाली आहे. हा निकष कंत्राटे घेण्यामध्ये देखील लागू झाला आहे. मध्यंतरी शिक्षण मंडळात दप्तर पुरवठय़ाच्या कंत्राटाबाबत या दोन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याची चर्चा आजही सुरू आहे. शिक्षण मंडळातील अनेक निविदांवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील डॉक्टरांची हुकमत आहे. परंतु त्यांच्या मर्जी व्यतिरिक्त दुसऱ्या ठेकेदाराला हे काम मिळाल्याने दप्तरांचे हे कंत्राट दोन वेळा रद्द करण्यात आले होते. त्यावेळी सत्तेत अर्धा हिस्सा दिला आहे त्याचप्रमाणे कंत्राटांमध्ये पण थोडी मेहरबानी करावी म्हणून काँग्रेसच्या नाखव्याची बोट थेट डॉक्टरांच्या मुक्कामावर धडकली होती. तेव्हा दप्तरांचे हे ओझे काँग्रेसच्या खांद्यावर देण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला.