नवी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने मानहानी खटल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा सुनावली. याप्रकरणी आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे वाशी पोलीस ठाण्याबाहेर जेल भरो आंदोलन करत या निकालाचा निषेध नोंदविण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात निवेदन देत राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेली शिक्षा म्हणजे दडपशाही असल्याचा आरोप केला. हेही वाचा - बाजारात भाज्यांची दरवाढ हेही वाचा - नवी मुंबई: २४ तास पाणीपुरवठा बंद यावेळी नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक म्हणाले की, राहुल गांधी कर्नाटकमध्ये बोलले गुन्हा सुरतमध्ये दाखल झाला. गुजरातमध्ये प्रशासन त्यांच्या हातात असल्याने हे घडले. आजही भाजपाचे लोक पातळी सोडून असंसदीय भाषेचा वापर करतात. त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे याचा आम्ही निषेध व्यक्त करत हे आंदोलन केले. यावेळी इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, सचिव लिना लिमये आदी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.