एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणावर देशी तर कमी प्रमाणात उटी लसूण दाखल होत आहे. मात्र देशी लसणाच्या पाकळ्या लहान असल्याने ग्राहक मोठ्या पाकळ्याच्या लसणाला पसंती देत आहे. त्यामुळे बाजारात उटी लसणाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. तर देशी लसणाकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य

उटी लसणाला अधिक पसंती

एपीएमसीत मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची आवक होते. मात्र सध्या मध्यप्रदेश मधून दररोज १० ते १५ गाड्यांचा शेतमाल बाजारात येत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या लसणाचा समावेश आहे. एक देशी लसूण आणि दुसरा उटी लसूण. बाजारात सध्या देशी लसूण जास्त पाहायला मिळत आहे. आज सोमवारी बाजारात लसणाच्या एकूण १३ गाडी आवक झाली आहे . बाजारात मध्यप्रदेश येथून लसूण दाखल होत आहे. त्यापैकी देशी लसणाच्या ११ तर उटी लसूण अवघे २ गाडी दाखल झाली आहे. मात्र सध्या बाजारात किरकोळ ग्राहक, हॉटेल व्यवसायिक, गृहिणी यांच्या कडून उटी लसणाला अधिक पसंती दिली जात आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत एकाच वेळी सिग्नलचे तिन्ही दिवे सुरु असल्याने वाहनचालक पडले गोंधळात

देशी पेक्षा उटी लसूण वरचढ

उटी लसूण आकाराने मोठा असून या लसणाच्या पाकळ्या मोठ्या असल्याने तो सोलायला सोपा जातो. मात्र, हा लसूण टिकाऊ नाही. शिवाय आपल्या देशी लसूणप्रमाणे त्यात तिखटपणाही जाणवत नाही. मात्र तरी देखील या उटी लसणाला मागणी जास्त आहे. त्यामुळे देशी पेक्षा उटी लसूण वरचढ ठरत आहे. यामध्ये देशी लसणाला प्रतिकिलो १० ते ५० रुपये तर उटी लसणाला ७०-९० रुपये बाजारभाव आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumers prefer ooty garlic more than indigenous garlic dpj
First published on: 26-09-2022 at 12:59 IST