नवी मुंबईत ५३,०९६ करोनाबाधितांपैकी ५१,२७२ जणांची करोनावर मात

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात करोनाचा कहर हळूहळू कमी होत आहे. शहरातील ५३ हजार ०९६ करोनाबाधितांपैकी ५१,२७२ जनांनी करोनावर मात केली असून शहरातील करोनामुक्तीचा दर ९७ टक्कय़ांवर पोहोचला आहे.

नवी मुंबई शहरातही करोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या  पार झाला असून शहरात दिलासादायक गोष्ट म्हणजे करोनाचे रुग्ण बरे होण्याच्या दरातही सतत वाढ होत आहे. शहरातील आरोग्यव्यवस्था अधिक मजबूत करून सर्वाच्या मदतीने व नागरिकांच्या सहकार्याने शहर करोनामुक्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, तर शहरातील करोनामुक्तीचा दरही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शहरासाठी ही दिलासादायक बाब असून शहर करोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईत  दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतरही करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढली होती. आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात जास्त चाचण्या करून रुग्ण वाढले तरी चालेल पण लवकर निदान करून तात्काळ उपचार करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याने आणि पालिकेच्या उपाययोजनांमुळे करोनामुक्तीचा दर वाढला आहे. करोनाला रोखण्यासाठी पालिका सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, तर करोना मृत्युदर कमी करण्यासाठीही प्रत्येक करोनामृत्यूबाबतही अतिशय गांभीर्याने घेतले जात आहे. करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये ५० वयोगटावरील रुग्णांची संख्या अधिक आहेत.

नवी मुंबई शहरात करोनामुक्तीचा दर वाढत असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. परंतु नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.

– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका