नागरिकांकडून संताप, पिण्याचे पाणीही नाही

पनवेल : कळंबोलीतील गोदामात ३३५ खाटांचे नवीन रुग्णालय सुरू केल्यानंतर पनवेल पालिका प्रशासनाने येथील समाजमंदिरातील ७२ खाटांचे करोना काळजी केंद्र बंद केले आहे. मात्र रुग्णालयाबाहेर आवारातच बारुग्ण सेवा सुरू ठेवली आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णांना व आरोग्यसेवकांना पिण्यासाठी पाणी नाही अशा तक्रारी आहेत.

पनवेल पालिकेने करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले असून इतर आजारांसाठी पालिकेचे नेमके धोरण काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कळंबोलीमध्ये ७२ खाटांचे समाजमंदिराच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू केले, मात्र हे रुग्णालय पालिकेने तिसऱ्या लाटेत अत्यावश्यक वेळी रुग्णसंख्या वाढल्यावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबोली वसाहतीची लोकसंख्या सुमारे तीन लाखांवर पोहोचली असून एका वसाहतीमध्ये एकच काळजी केंद्र पालिकेने सुरू ठेवले आहे. या रुग्णालयात सकाळी १० ते दुपारी दीड वाजेपर्यंत डॉक्टर, प्रयोगशाळेचे तज्ज्ञ, करोना चाचणी केंद्र आणि औषधालयातील आरोग्यसेवक रुग्णसेवा देतात. एकही रुपया न घेता ही सेवा पालिका देते खरी, मात्र ही सेवा उघडय़ावर सुरू आहे.

याबाबत अद्याप पालिकेने स्पष्टीकरण दिलेले नाही. दिवसाला सूमारे ५० ते ६० रुग्णांना येथे वैद्यकीय सेवा व औषधे दिली जातात. याच दवाखान्यात करोनाची प्रतिजन आणि आरटीपीसीआर या चाचण्या तातडीने केल्या जातात. करोनाचे नकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांचे लक्षणे असल्यास प्रयोगशाळा तज्ज्ञ डेंगी व हिवतापाच्या चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेतात. या उघडय़ावरील दवाखान्याची सध्या कळंबोलीत जोरदार चर्चा सुरू आहे.  या उघडय़ा केंद्रात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही तसेच येथे पाण्यासारखी पायाभूत सुविधाही नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

 कळंबोली येथील समाजमंदिरात तातडीने दवाखाना पालिकेने सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच या दवाखान्याची वेळ ही सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंतची ठेवल्यास त्याचा हजारो नागरिकांना लाभ होईल. पालिका स्वतंत्र आरोग्य केंद्राच्या इमारती बांधत आहे. मात्र या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन त्या सुरू करेपर्यंत अजून दोन वर्षे लागतील. तोपर्यंत समाजमंदिरामध्ये दवाखाना सुरू ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पालिकेचे नगरसेवक सतीश पाटील यांनी केली आहे.