नवी मुंबईत निर्बंधांची कठोर अंमलबजावणी

नवी मुंबई : संपूर्ण राज्यासह नवी मुंबईतही गुरुवारी रात्री आठपासून कडक निर्बंधांसह आणि नवीन नियमावलीसह टाळेबंदी सुरू करण्यात येत असल्याने पालिका व नवी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी नियमावलीचे पालन करून पालिका व पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्बंध काळात शहरात एक हजार पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत.

संचारबंदीच्या काळात अनेक नागरिक बिनधास्त व मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे कडक टाळेबंदीच्या निर्णयाची गुरुवारी सायंकाळपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहरभर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. यात केवळ मुख्य रस्ताच नव्हे तर अंतर्गत भागांतही बंदोबस्त लावण्यात येणार आहे. अनेकदा मुख्य रस्ता सुनसान असतो मात्र अंतर्गत भागात खास करून गावठाण भागात वर्दळ असते. दुकाने अर्धी उघडून सुरू ठेवण्यात येतात, त्यामुळे अंतर्गत भागातही बंदोबस्त आणि गस्ती पथकेही असणार आहेत. शहरात सुमारे १ हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच गरज पडली तर अतिरिक्त कुमक राखीव ठेवण्यात आली आहे.

मुखपट्टी न घालणारे आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे.  नागरिकांनी टाळेबंदीचे काटेकोर पालन करावे अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. दुसरीकडे अत्यावश्यक प्रवासाला परवानगी दिली असून फक्त ५० टक्के प्रवाशांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार असल्याने नवी मुंबई परिवहन उपक्रमाने नियोजन केले आहे. शहरात सद्य:स्थितीला २०० गाड्या

धावत असून शहरातील अत्यावश्यक प्रकारातील दुकाने ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार असल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम होणार आहे. त्याबाबतही परिवहन उपक्रमाने नियोजन केले आहे. शहरात परिवहन उपक्रमातील जवळजवळ ५०० गाड्यांपैकी फक्त २०० गाड्या रस्त्यावर धावणार आहेत.

तसेच शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत तसेच कारवाईबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे टाळेबंदीत नागरिकांनी योग्य नियम पाळावेत. करोनाचे संकट दूर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी योग्य सहकार्य करावे.   – अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त

नवी मुंबईकरांनो, करोना थांबला नाही तर कदाचित टाळेबंदीचे दिवस वाढतील. हे थांबवणे नागरिकांच्याच हाती आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनो, नियमावली पाळा. घरीच राहा, सुरक्षित राहा.

 -सुरेश मेंगडे , पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी गाड्यांबाबत चाचपणी करण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी गाड्या वाढवल्या जातील तर काही ठिकाणी गाड्या कमी केल्या जातील. शुक्रवारची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

 शिरीष आदरवाड, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई