७३५ वरून ५८१ दिवसांवर

नवी मुंबई</strong> :  दिवाळीनंतर करोना रुग्णांत हळूहळू घट होत गेल्याने रुग्णदुपटीचा कालावधी वाढत ७३५ दिवसांवर पोहचला होता. यामुळे शहरातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र गेली पंधरा दिवसांत शहरात पुन्हा करोना रुग्णांत वाढ गेल्याने यात मोठी घट झाली आहे. हा कालावधी आता ५८१ दिवसांवर आला आहे.

नववर्षांपासून देण्यात आलेली शिथिलता व करोना संसर्ग कमी होत गेल्याने नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्त. त्यात सर्वासाठी लोकल खुली करण्यात आल्यामुळे मुंबईसह, ठाणे व उपनगरांत करोना रुग्णांत वाढ होत आहे.

नवी मुंबईतही नव्या रुग्णांची संख्या ३७ पर्यंत कमी झाली होती ती आता परत दररोज ८० ते ९० रुग्णांपर्यंत जात आहे. त्यामुळे सातशेपर्यंत खाली आलेली उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत ती ८२५ पर्यंत गेली आहे. शहरातील रुग्णदुपटीचा कालावधी जानेवारीमध्ये सातत्याने कमी झाल्याने तो ७३५ दिवसांवर गेला होता. परंतू आता तो ५८१ दिवसांवर खाली आला आहे. मार्चमध्ये करोना संसर्ग पसरल्यानंतर मे महिन्यात करोनारुग्ण दुपटीचा कालावधी हा ११ दिवसांवरुन फक्त ६ दिवसावर खाली आला होता. त्याचप्रमाणे पुढील दोन महिने अतिशय कठीण व संकटाचे गेले होते. यावर पालिका प्रशासनाने उपाययोजना करीत आरोग्य सुविधांत वाढ केली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये ४५ दिवसांवर असलेल्या रुग्णदुपटीचा कालावधी हळूहळू वाढत जात जानवारीत ६३४ तर फेबुवारीच्या २ तारखेपर्यंत तो ७३५ दिवसांपर्यंत म्हणजे दोन वर्ष कालावधीपर्यंत गेला होता. मात्र त्यानंतर रुग्णवाढ होत गेल्याने त्यात घट झाली आहे.  शहरातील करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी

* १५ ऑगस्ट : ४५ दिवस

* १५ सप्टेंबर : ६७ दिवस

* १५ ऑक्टोंबर :       १११ दिवस

* १५ नोव्हेंबर : ३५२ दिवस

* १५ डिसेंबर : ४५४ दिवस

* १५ जानेवारी :        ६३४ दिवस

* २ फेब्रुवारी :   ७३५ दिवस

* १६ फेब्रुवारी : ५८१ दिवस

शहरातील करोनाचे नवे रुग्ण वाढत असून याबाबत पालिका प्रशासनाला पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील करोना रुग्णदुपटीचा कालावधी हा ७३५ दिवस म्हणजेच २ वर्षांपेक्षा अधिक झाला होता तो १ फेब्रुवारीनंतर  पुन्हा ५८१ दिवसावर खाली आला आहे. त्यामुळे नागरीकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका