राष्ट्रीयीकृत बँकांना प्राधान्य दिल्याने चलनदुष्काळ; ग्राहकांच्या हालात भर

रिझव्‍‌र्ह बँकांकडून पैशांचे वाटप केले जात असताना त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने सहकारी बँकांच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे बँक व्यवस्थापक ग्राहकांजवळ जाहीर करीत आहेत. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी बँक सुरू ठेवल्यानंतर सोमवार गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टी घेतल्यानंतर मंगळवारी बँका उघडल्या. त्यामुळे शाखांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या; मात्र त्यासाठी सहकारी बँकांकडे कोणतीही उपाययोजना नसल्याचे स्पष्ट झाले.

मागील आठवडय़ात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे व हजाराच्या नोटा अचानक बंद केल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशात अभूतपूर्व चलनकल्लोळ निर्माण झाला असून सोमवारी बँकांना एक दिवसाची सुट्टी जाहीर झाल्याने मंगळवारी या कल्लोलात अधिक भर पडली. रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकाना वित्तपुरवठा केला जात असून त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचा फटका सहकारी बँकांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून पारसिक बँकेचे नाव घेतले जात असून पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी बाळगणाऱ्या या बँकेच्या ऐरोली सेक्टर एक येथील शाखेत मंगळवारी सकाळी अकरा वाजताच पैसे संपल्याचे बँक अधिकारी काकुलतीला येऊन सांगत होते. आमच्या कडे असलेल्या नोटा बदलून देऊ नका पण आमच्या खात्यात असलेल्या पैशातील थोडे पैसे तरी द्या, अशी विनवणी एक महिला बँक अधिकाऱ्यांना करीत होती, पण बँकेत पैसेच नाहीत तर देऊ कुठून असा प्रतिसवाल बँक अधिकारी करीत होते.

घरात एक पैसा नसल्याने आज खाऊ काय असा प्रश्न उपस्थित करून ही महिला रडवलेल्या चेहऱ्याने बँकबाहेर पडली. आज पैसे मिळतील म्हणून ती सकाळी आठ वाजल्यापासून बँकेसमोर रांगेत उभी होती.

सरकारी बँकांकडेही ‘सहकारी’ची मागणी

कमी-अधिक प्रमाणात अभ्युदय, भारत सहकारी, ठाणे जनता, श्यामराव विठ्ठल, कर्नाळा बँक, यासारख्या सर्वच सहकारी बँकेत हीच स्थिती असून ह्य़ा सहकारी बँकांची खाती स्टेट, रिझव्‍‌र्ह आणि आयडीबीआय यांसारख्या राष्ट्रीयीकृत बँकेत असल्याचे एक बँका व्यवस्थापकाने सांगितले. ह्य़ा राष्ट्रीयीकृत बँकांकडेही सहकारी बँका रोख रक्कम मागत असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँका सहकारी बँकांना रक्कम देत नसल्याने सहकारी बँकेत खाते असलेल्या ग्राहकांना पैसे मिळेनासे झाले आहे.