‘मनपंसत योजने’तील सिडकोच्या छोटय़ा घरांना पसंती | Loksatta

‘मनपंसत योजने’तील सिडकोच्या छोटय़ा घरांना पसंती

सिडकोने ती दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा विक्रीस काढली असून त्याला चांगली मागणी आली आहे.

‘मनपंसत योजने’तील सिडकोच्या छोटय़ा घरांना पसंती
संग्रहित छायाचित्र

सिडकोच्या मनपसंत योजनेअंतर्गत विविध विविध गृहनिर्माण प्रकल्पांत गेल्या १०-१२ वर्षांत शिल्लक राहिलेल्या घरांची विक्री करण्यात येत आहे. त्यात ग्राहकांनी छोटय़ा घरांना पसंती दिली आहे. त्यामुळे कोटय़वधींच्या घरात किमती असलेली मोठी घरे पुन्हा शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ३८० शिल्लक घरांसाठी सिडकोने २४ हजार १७१ अर्जाची विक्री केली असून त्यातील सुमारे सहा हजार मागणी अर्ज सिडकोकडे आले आहेत. यात उलवा, सेलिब्रेशन, वास्तुशिल्प येथील छोटय़ा घरांना अधिक मागणी असून व्हॅलिशिल्पमधील कोटय़वधी रुपयांच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

सिडकोने खारघर, उलवा येथील गृहनिर्माण प्रकल्पातील ३८० शिल्लक घरांची विक्री मनपंसत योजनेअंर्तगत मागील महिन्यात सुरू केली आहे. ही घरे विविध ११ आरक्षणांतील आहेत. त्यामुळेच ती विकली गेली नव्हती. सिडकोने ती दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा विक्रीस काढली असून त्याला चांगली मागणी आली आहे. केवळ ३८० घरांसाठी २४ हजार १७१ अर्ज विकले गेले असून गुरुवार पर्यंत ५ हजार ७४० मागणी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या अर्जाची छाननी सुरू होती. अर्ज स्वीकारण्याची मुदत शुक्रवापर्यंतच होती. त्यामुळे ग्राहकांची ठाणे जनता सहकारी बँकेच्या विविध शाखांत झुंबड पडली होती.

गुरुवापर्यंत आलेल्या अर्जात आणखील ४००-५०० अर्जाची भर पडून ते सहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता सिडको अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सिडकोच्या उलवा व खारघर येथील छोटय़ा घरांना जास्त मागणी आहे. सोळा लाखांपासून ते तीस लाखापर्यंतची घरे खरेदी करण्यात ग्राहकांना स्वारस्य आहे. व्हॅलिशिल्पमधील घरे आकाराने मोठी असल्याने त्यांची किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे. या संकुलात तरण तलाव ते अद्ययावत व्यायामशाळेपर्यंत सर्व सुविधा आहेत. जास्त दर आकारण्यात आले आहेत. बांधकाम क्षेत्रात असलेली मंदी आणि नोटाबंदीमुळे मोठय़ा घरांना कमी मागणी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2016 at 04:25 IST
Next Story
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा रस्त्यावर सराव