दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून या सणानिमित्त नवी मुंबईकरांसाठी अर्बन हाटमध्ये दीप मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळयामध्ये दीपवलीसाठी ग्राहकांना आकाशकंदील, पणत्या, सुगंधी उटणे, नवनवीन कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यंदाच्या दीपावलीसाठी आवश्यक असलेल्या शोभिंवत वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू, सुंदर व देखणे कपडे, यांसह विविध राज्यांतील महिला बचतगटाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू तसेच हस्तकलाकारांनी घडविलेल्या दीपमाळा, रोषणाईच्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सध्या सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाट मध्ये सुरू आहे. नवी मुंबईच नव्हे तर मुंबई, ठाणे, पनवेल येथील नागरिकांसाठीही दिवाळीच्या खेरदीसाठी दीपमेळा ही पर्वणी ठरणार आहे.
मॉलमध्ये अथवा बाजारपेठेमध्येदेखील मिळणार नाहीत अशा हातमाग व हस्तकौशल्याच्या विविध वस्तू दीपमेळयात उपलब्ध आहेत. चांदीचा मुलामा दिलेल्या धातूंच्या मूर्ती तसेच टेराकोटा प्रकारातील मातीच्या दीपमाळा व सुगंधित मेणबत्त्या, हातमागाने बनवलेले आकाशकंदील असे अनेकविध पर्याय ही दीमेळ्यांची आकर्षणे ठरली आहेत.
पंजाब, हरयाणा, काश्मीर, आंध प्रेदश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील हातमागाचे ड्रेस मटेरियल तसेच बिहार, पिश्चम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक व जम्मू काश्मीर या राज्यांतील सिल्क तसेच सुती साडय़ाही मेळ्यात विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
तागाच्या आणि बांबूच्या वस्तू, दगडापासून बनवलेल्या कलाकुसरी, चित्रे, कृत्रिम दागिने, गालिचे व आकर्षक शिल्पही मेळ्यात मांडण्यात आली आहेत. नैसर्गिक दागिने, नक्षीदार दिवे, बनारसी साडय़ा आणि कॉटन साडय़ा, बेडशीट्स, डोअर मॅटस, फर्निचर, ड्रेस मेटरिअल, महिला व पुरुषांचे शर्ट, कुर्ता, चमडय़ाच्या बॅगा, चप्पल आणि बुट्स पडदे, कारपेट आणि विविध प्रकारचे हातमाग उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहे. खवय्यांसाठी स्वतंत्र खाद्यगृहाचीही व्यवस्था असून तिथे राजस्थानी कोल्हापुरी, दक्षिण भारतीय आणि दिल्ली चाट यासारख्या चविष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध आहे. या वर्षी प्रथमच सिडकोच्या वतीने सेंद्रिय फळेविक्रीसाठी शेतकऱ्यांना जागा देण्यात आली आहे.
अमरावती आणि नागपूर येथील संत्री शेतकरी संघटनेच्या वतीने सेंद्रिय संत्री विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.