नवी मुंबई : ठाणे बेलापूर एमआयडीसीतील वृक्षतोड वादग्रस्त ठरली आहे. वृक्षतोडीचे सर्व नियम धाब्यावर बसवून ती केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, तर सर्व काही नियमांनुसारच होत असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये  करोनाकाळापासून  मोठय़ा प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी केला आहे.  करोनाकाळात वर्तमानपत्रांचे वितरण अगदी कमी किंवा पूर्ण थांबलेले असताना  याविषयी हरकती आणि सूचना मागविल्या होत्या, जेणेकरून त्या कोणाच्या वाचनात येणार नाहीत,  त्याचप्रमाणे एका निर्माणाधीन इमारतीच्या जागेतील २९ झाडांची विनाकारण कत्तल केल्याचा आरोपही  सलीम सारंग या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकाने केला आहे.

 बुलेट ट्रेनचेही काम वेगात सुरू असून महापे येथील पी २ या भूखंडावरील झाडे तोडण्यापूर्वी जीपीएस प्रणाली वापरून फोटो काढण्यात आले नाही. झाडांवर नोटीस लावण्यात आल्या नाहीत, हरकती आणि सूचना मागवण्याची जाहिरात नवी मुंबईतील वृत्तपत्रात देणे अपेक्षित असताना त्या ठाण्यातील वृत्तपत्रात देण्यात आल्या, असे आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनार्जित चव्हाण यांनी केले.

महापे आणि पावणे भागातील वृक्षतोडीविषयक माहिती देण्यासही एमआयडीसीचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. वृक्षतोडीमुळे गावे अगदीच उजाड दिसत असल्याचे मत विश्वनाथ घरत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.

एमआयडीसीने के लेली वृक्षतोड नियमांना धरूनच करण्यात आलेली आहे, तरीही त्यात काही नियमबा आढळल्यास जरूर कारवाई केली जाईल.

सतीश बागल,  प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ