किमती प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा निम्म्याहून कमी
उरण : गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस उरले असून सध्या बाजारात गणेशमूर्ती घेण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. पर्यावरणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने पर्यावरणपूरक म्हणजेच शाडूच्या मातीच्या मूर्तीना मागणी आहे. ८ इंचांपासून ते ४ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा निम्म्याहून कमी आहेत.
रायगडमधील पेण तालुका व त्यातील हमरापूर परिसर हा गणेशमूतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तर अनेक गावातून परंपरेने शेकडो वर्षे गणेशमूर्ती साकारणारे कारखानेही आहेत. यातील बहुतेक कारखाने सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचीही संख्या रोडावल्याने बहुतांशी कारखाने बाहेरून मूर्ती आणून त्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती महाग पडत असल्याचे निशांत केणी यांनी सांगितले.
उरण शहरात शाडूच्या मातीच्याच मूर्ती बाजारात आल्या आहेत. यामध्ये एक फुटापर्यंतच्या मूर्तीची किंमत २ हजार रुपयांपर्यंत आहे. तर एक फुटापेक्षा मोठी मूर्ती २ ते ३ हजारांपर्यंत आहेत. त्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीच्या किमती या ४ ते साडेचार हजारांपर्यंत आहेत. त्यातच गणेशमूर्ती आकर्षक व हिऱ्या-मोत्यांच्या दागिन्यांनी सजवलेल्या असल्याने किमती वाढल्या आहेत.
सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठय़ा प्रमाणात होत असल्याने पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. गणेशोत्सवाच्या काळात आम्ही हक्काने शाडूच्याच मातीच्या मूर्तीची मागणी करीत असल्याचे गणेशभक्त कल्पना पाटील यांनी सांगितले.