अवकाळी पाऊस, वाऱ्यामुळे मोहोर गळला, बुरशीमुळे फळांवर काळे डाग

नवी मुंबई : गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे हापूस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. या पावसामुळे मोहोर गळाला असून त्यावर बुरशी चढली आहे. तर ज्या झाडांना फळे आली आहेत, त्यावर काळे डाग पडले आहे. यामुळे हापूसचा हंगाम एक महिना लांबणीवर पडणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारा हंगाम मार्चमध्ये सुरू होईल व तो ६० दिवसांचा राहील .

हापूसच्या झाडाला नोव्हेंबरमध्ये पहिला, डिसेंबर, जानेवारी महिन्यात दुसरा तर फेब्रुवारी महिन्यात तिसरा असा तीन वेळा मोहोर लागतो. मात्र आता नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने सुरुवातीच्या हापूस फळ धारणेला फटका बसला आहे. आता हापूस आंब्याचे पीक हे फळधारणा प्रक्रियेत आहे. मात्र पावसाने यावर पाणी फेरले आहे. लागलेला मोहोर गळून पडला आहे तर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. मोहोरावर पाणी साचल्याने तो कुजून गेला आहे.  शिवाय काही ठिकाणी फळधारणेस सुरुवात झाली होती, त्यावर काळे डाग पडले आहेत. २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औषध फवारणी खर्चात वाढ

अवकाळी पावसाने हापूस संकटात सापडला आहे. आधी १५ ते २० दिवसांतून एकदा औषध फवारणी करावी लागत होती. मात्र आता उत्पादन वाचविण्यासाठी दोन ते तीन दिवसांतून फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे औषध फवारणी खर्च दुपटीने वाढला आहे.

देवगडमध्ये  हापूस फळ धारणा प्रक्रियेत होत, परंतु अवेळी पडणाऱ्या पावसाने फवारणी खर्च वाढला असून आमचे आर्थिक नुकसान झाले आहेच. शिवाय पुढील कालावधीत थंडीचे पोषक हवामान असेल तरच पीक उभारी घेऊ शकेल. हापूसचा मोहोर गळाला असून पालवीही कुजून गेली आहे, तर काही छोटे आंबे काळे पडले आहेत.

संकेत पुजारे, हापूस बागायतदार, देवगड