११ वर्षांनंतर पतीची लबाडी उघड झाल्याने पोलिसांकडे धाव

पनवेल : ११ वर्षांनंतर आपला पती डॉक्टर नसल्याचे समजल्यामुळे एका डॉक्टर पत्नीने खुद्द त्याच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.  संबंधित डॉक्टरला पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.

बोगस डॉक्टरची ओळख लपविण्यासाठी त्याला साहाय्य केल्याप्रकरणी त्याचे नातेवाईक व ज्या रुग्णालयात संबंधित बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत होता त्या रुग्णालयाच्या मालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पनवेलमधील एक उच्चशिक्षित कुटुंबातील डॉक्टर तरुणीचा विवाह पेण तालुक्यातील एका डॉक्टर तरुणासोबत झाला होता. महेंद्र बामा पाटील असे या प्रकरणी अटक असलेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्र हा पेण येथील अनेक रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता.

याच परिसरात संबंधित फिर्यादी तरुणी वैद्यकीय सेवेचे काम करत होती. संबंधित तरुण पेण येथील बडय़ा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवेसाठी जात असल्याने संबंधित तरुणीचा व तिच्या नातेवाईकांचा तो डॉक्टर असल्यावर विश्वास पटला. २००७ साली विवाह झाल्यानंतर पाटील डॉक्टर जोडप्याला सात वर्षांचे अपत्य आहे.

वैद्यकीय शिक्षण कुठे झाले याबद्दल नेहमी वेळ मारून नेण्याची उत्तरे पतीकडून मिळत असल्याने संशय बळावला. या प्रकरणात अटकेत असलेल्या महेंद्र याने अनेक रुग्णांवर पेण येथील खासगी विविध रुग्णांलयांमधून उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या विविध परिषदांमध्ये तो सामील झाला आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या तो पदाधिकारी आहे. ही सर्व सामाजिक फसवणूक असल्याचे मत डॉक्टर पत्नीचे झाल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.