नोटबंदीमुळे रसिकांची नाटय़गृहांकडे पाठ; गर्दीअभावी नाटय़प्रयोग रद्द

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील नाटय़गृहांवर नोटांवरील बंदीचा मोठा परिणाम झाला आहे. आठवडाभरात नवी मुंबई आणि पनवेलमधील नाटय़गृहांत तिसरी घंटा जवळपास बंदच आहे. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात गेल्या आठ दिवसांत नाटकाचा एकही प्रयोग झालेला नाहीत, तर वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात केवळ एकच प्रयोग झाला आहे. रसिकांनी पाठ फिरवल्यामुळे नाटय़गृहे आणि कलाकारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

[jwplayer 4EcaOMGB]

नोटा रद्द झाल्यामुळे नाटय़रसिकांना तिकीट परवडेनासे झाले आहे. नाटय़गृहात जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. वाशीतील भावे नाटय़गृह आणि पनवेलमधील फडके नाटय़गृहात डेबिट कार्ड आणि धनादेश स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, नाटक पाहण्यासाठी गर्दी होत नाही. त्यामुळे नाटकांचे प्रयोग रद्द करावे लागल्याची माहिती बुकिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दोन्ही नाटय़गृहांत दिवसातून प्रत्येकी तीन नाटय़प्रयोग होतात. भावे नाटय़गृहाची आसनक्षमता आठशे तर फडके नाटय़गृहाची आसनक्षमता सहाशे आहे. नाटकांचे प्रयोग बंद झाल्यामुळे नाटय़गृहांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. आधीच देखभाल दुरुस्तीचा खर्च परवडत नाही. त्यातच नाटकांचे प्रयोग बंद झाल्यामुळे नाटय़गृह व्यवस्थापन संकटात सापडले आहे.

५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा परिणाम नाटय़गृहांवर झाला आहे. आठवडय़ात तीन प्रयोग रद्द करावे लागले. केवळ एकच प्रयोग झाला. तिकीट खिडकीवर ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे रसिक प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. गर्दीच होत नसल्यामुळे प्रयोग रद्द करावे लागत आहेत. त्याचा परिणाम नाटय़गृहांच्या उत्पन्नावर झाला आहे.

– नैनेश बदले, उपव्यवस्थापक, विष्णुदास भावे नाटय़गृह

[jwplayer eW0sv8sU]

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama theater in panvel close due to currency ban
First published on: 19-11-2016 at 02:06 IST