ताज्या मासळीच्या दुष्काळामुळे सुकी मासळी महाग; भाज्याही कडाडल्या
वाढत्या प्रदूषणामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या उरण तालुक्यातील शेकडो पारंपरिक कुटुंबावर ओल्या सोबत सुक्या मासळीच्या दुष्काळालाही सामोरे जावे लागत असून समुद्रात विकासाच्या नावाने होणारे मातीचे भराव व वाढत्या प्रदूषणामुळेही मासळीच्या प्रजननावरही संकट आल्याने शेकडो पारंपरिक मच्छीमार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. तर दुसरीकडे मासळीचे प्रमाण घटल्याने ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीचे दरही वाढले आहेत. यावर्षी पावसाळ्या पूर्वी सुरू असलेल्या सुक्या मासळीच्या खरेदीच्या दरात ३० ते ४० दराने वाढ झाली आहे.याचा परिणाम सुक्या मासळीच्या व्यवसायावर व खरेदीवरही जाणवू लागला आहे.भाजीच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना सुकी मासळी आणि भाजीही परवडनाशी झाली आहे. त्यातच मटणाचा दर किलो मागे ४४० व चिकन १६० ते १८० रूपये किलोवर पोहचला आहे. गावठी कोंबडी ५०० रुपयांवर पोहचली आहे.
मासळीचा दुष्काळ हा सध्या मच्छीमारांच्या पाचवीलाच पुजला आहे.तर दुसरीकडे शासनाकडून मच्छीमारांना मिळणाऱ्या अनुदानांचीही पूर्तता होत नसल्याने शेकडो मासेमारी बोटी उरणच्या मोरा व करंजा बंदरात नांगराव्या लागल्या आहेत. उरण तालुक्यातील करंजा व मोरा या दोन्ही बंदरांत मिळून छोटय़ा-मोठय़ा दोन हजारांच्या आसपास मच्छीमार बोटी आहेत. मोठय़ा मच्छीमार बोटींवरील खलाशी आणि मालक यांच्यातील पर्सिनेटचा वाद चिघळू लागला आहे. त्यातच दोन महिन्यांसाठी पावसाळी मासेमारीवरील बंदी आहे. त्यामुळे नियमित मासेमारी सुरू झालेली नसल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार सुशांत कोळी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे समुद्र किनाऱ्यावर बंदर व इतर उद्योगांच्या उभारणीसाठी समुद्रात मातीचा भराव केला जात आहे.