पाणी बचत मोहीमेला चांगला प्रतिसाद; ठिकठिकाणी केवळ रंगाची उधळण
गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात पाणी टंचाईचे भीषण संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये कोरडी होळी साजरी करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेने पाणी बचतीसाठी केलेल्या आवाहनाला तसेच सामाजिक माध्यमांवर केलेल्या जाजागृतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नवी मुंबईत जल्लोश
नवी मुंबई शहरात पारंपरिक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विधिवत पूजन करून पेटवलेल्या होळीभोवती फेर धरणारी लहान मुले, तरुणाईचा जल्लोश असे उत्साही वातावरण चौकाचौकात होते. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. तर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच श्रीफळ वाहण्यासाठी गर्दी होती. मोलाचे हे क्षण मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी तरुणाई आघाडीवर होती. अनेकांनी आकाशाकडे झेपावत असलेल्या ज्वाळा मोबाइल व कॅमेऱ्यामध्ये टिपल्या.
होळी, रंगपचमी जल्लोश जे.व्ही.एम. मेहता, दत्ता मेघे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महाविद्यालयातदेखील होता. विद्यार्थ्यांनी होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. होळीच्या दिवशी महाविद्यालय आणि शाळा सुरू असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या सहकाऱ्यांना रंग लावण्यासाठी आपल्यासोबत विविध प्रकारची रंग घेऊन आले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या व शाळेच्या प्रागणात होळीचा जल्लोश होता. लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण होऊन होळीचा जल्लोश परिसरात घुमला.
कोरडी रंगपंचमी
लोकप्रतिनिधींनी फलकबाजी करून तर सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील समाजमाध्यमांवर कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करत जनजागृती केली. सुजाण नागरिकांनीदेखील पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून नैसर्गिक रंगाने होळी खेळण्याचे यंदा पसंत केले व पालकदेखील लहान मुलांमध्ये याबद्दल जनजागृती करत असल्याचे दिसून येत होते. अनेक निवासी संकुलांतील सोसायटींनी कोरडी होळी खेळण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे शहरात पाण्याची नासाडी झालेली दिसून आली नाही.
पालिकेची विशेष मोहीम
पाणीटंचाई लक्षात घेऊन होळी व धूलिवंदनाच्या दिवशी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जलबचतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. नवी मुंबईत विविध विभागांत ही मोहीम राबवून जलबचतीचा संदेश मोठय़ा प्रमाणावर नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ज्या ठिकाणी पाण्याचा गैरवापर होत असेल तेथे कारवाई करण्याची सूचनाही देण्यात आली होती. जनजागृती मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी नवी मुंबईतील सुजाण नागरिकांनी होळी व धूलिवंदन सणामध्ये पाणीबचतीसाठी चांगले सहकार्य केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
पनवेलमध्ये जलबचत
पनवेल : पनवेल परिसरात जलबचतीच्या सामाजिक संदेशाला अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांनी आपला प्रतिसाद नोंदविला. नुसते व्हॉट्सअ‍ॅपवर जलबचतीचे संदेश फॉरवर्ड करण्यापलीकडे आज अनेकांनी रंगपंचमीत पाण्याचा वापर टाळून पाण्याची बचत केल्याचे चित्र पनवेल शहर व सिडको वसाहतींमध्ये दिसत होते. अनेक सामाजिक व राजकीय व्यक्तींनी यामध्ये पुढाकार घेऊन तशा आशयाचे प्रसिद्धिपत्रक काढले होते. कळंबोलीमधील रोडपाली युवा मित्रमंडळ व खारघर वसाहतीमधील एम्पायर इस्टेट सोसायटी ही त्यापैकी एक आहे.
रोडपाली युवाच्या सदस्यांनी नोडमध्ये दोन हजार नागरिकांपर्यंत पत्रके पोहचवून यंदाचे पाणी संकट व त्यानिमित्त रंगपंचमीत पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन केले. कळंबोलीत अनेक ठिकाणी भिंतींना पत्रके चिटकवून आवाहन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच एम्पायर सोसायटीतील महिला व लहान मुलांनी एकत्र येऊन कोरडे रंग लावून यंदाची रंगपंचमी साजरी केली. खारघरमध्ये पाण्याचे भीषण संकट आहे. एम्पायर या सोसायटीमध्ये विंधणविहीर (बोअरवेल) आहे. सोसायटीमध्ये २४ तास पाणी उपलब्ध असतानाही या सोसायटीतील सदस्यांनी पाणी बचतीचा हा संकल्प एकत्रितपणे राबविला.
मासळीच्या दुष्काळातही होळी उत्साहात
उरण : मासळीचा दुष्काळ, मासेमारीवरील शासनाची बंदीची टांगती तलवार व कर्जबाजारीपणा अशी एका मागून एक अनेक संकटे सध्या मच्छीमारांसमोर उभी असतानाही त्याचे रडगाणे न गाता कोळी बांधवांनी आपली पारंपरिक होळी उत्साहात साजरी केली. कोळी बांधवांनी मासेमारी बोटी सजवून, नाचत, वाजतगाजत मासे बोटीला लावून होळी साजरी केली. उरणमधील करंजा व अलिबाग येथील रेवस बंदरातील बोटींनी बंदरावर फेऱ्या मारून समुद्राला नमन करण्याची प्रथा कायम राखत हा सण साजरा केला. तर उरण तालुक्यात पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन काही ठिकाणी कोरडी धुळवड साजरी करण्यात आली.
होळीच्या दिवशी मच्छीमारांनी आपल्या बोटींची सजावट केली होती. या बोटींवर नव्या साडय़ा तसेच पताकांची सजावट करण्यात आली होती. देवाची पूजा करून बोटीवरच गुलाल व रंग उधळण्यात आला. यावेळी मासेमारी करून आणण्यात आलेला सर्वात मोठा म्हणजे सुमारे २५ ते ३० किलोचा मासा बोटीच्या समोरच्या भागाला लावून त्याची पूजा करण्यात आली, अशी माहिती करंजा येथील मच्छीमार प्रदीप नाखवा यांनी दिली. दिवसभर समुद्रात आनंद साजरा केल्यानंतर बोटीला लावलेला मासा काढून तो गावातील आप्तेष्टांना तसेच बोटीवर काम करणाऱ्यांना वाटला गेला. हा पारंपरिक उत्साह पाहण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी बंदरावर गर्दी केली होती. याही वर्षी करंजा, मोरा, रेवस या बंदरातील मच्छीमारांनी पारंपरिक होळी साजरी केली.