तिसऱ्या लाटेचा धोका कायम; दैनंदिन रुग्णसंख्या ६०च्या घरात स्थिर राहिल्याने दिलासा

नवी मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात झपाटय़ाने करोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्ण दुपटीचा काळ हा ८० दिवसांपर्यंत खाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी १२०८ दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाची पहिली लाट जानेवारी महिन्यात कमी होत रुग्णदुपटीचा काळ ७३५ दिवसांवर गेला होता. मात्र मार्चपासून शहरात पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग झपाटय़ाने पसरला होता. त्यामुळे शहरात रुग्णवाढ मोठी होती. एप्रिलमध्ये तर करोनाकाळातील सर्व उच्चांक रुग्णसंख्येने मोडले गेले. दैनंदिन रुग्णसंख्या ही एक हजारांपर्यंत गेली होती. त्यामुळे शहराचा धोका वाढला होता. रुग्णदुपटीचा काळ हा ८० दिवसांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंध व पालिका प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे या संकटातून शहर बाहेर पडले आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या ही ५० पर्यंत स्थिर आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळही वाढला आहे. सध्या हा कालावधी १२०८ दिवस म्हणजे ३ वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. हा मोठा दिलासा शहराला मिळाला आहे.

सोमवारपासून शहरातील रुग्णस्थिती आटोक्यात आल्याने निर्बंध उठविण्यात आले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. यामुळे काही प्रमाणात रुग्णवाढ होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत अद्याप रुग्णसंख्या स्थिर आहे. शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला असून ही शहरासाठी समाधानकारक बाब असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duration double patient navi mumbai ssh
First published on: 12-06-2021 at 02:44 IST