बेशिस्त वाहनचालकांना चाप; महिनाभरात प्रणाली कार्यान्वित होणार

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर आता शीव-पनवेल महामार्ग, खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेलमध्येही ई-चलन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. महिनाभरात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणे, सिग्नल मोडणे, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगाची मर्यादा न पाळणे असे प्रकार सर्रास घडतात, मात्र दंड आकारताना वाहनचालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात वाद होतात. काही वेळा वाहतूक पोलिसांवर हल्ला केला जातो. शिवाय दंड टाळण्यासाठी वाहन भरधाव चालवणाऱ्यांमुळे अपघातही होतात. ई-चलन पद्धतीमुळे या समस्या दूर होणार आहेत. पोलिसांची कार्यक्षमता वाढेल आणि नियम मोडणाऱ्यांवर वचक बसेल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. राज्यात ई-चलन पद्धतीचा अवलंब सर्वप्रथम नवी मुंबईत करण्यात आला. त्यापाठोपाठ आता परिमंडळ २ मध्ये महिन्याभरातच या कारवाईला सुरुवात होणार आहे. परिमंडळ १च्या तुलनेत परिमंडळ २मध्ये अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरांची दृश्य टिपण्याची क्षमता अधिक असणार आहे. या कॅमेरांमुळे वाहनाच्या वेगाचीही माहिती मिळणार आहे. वाहनचालकाने वेगाची मर्यादा मोडली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करता येणार आहे.

नवी मुंबईतील परिमंडळ १ मध्ये २०१४ साली ई-चलन सुरू करण्यात आले. २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालावधीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ६ हजार ५०३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. नियम मोडून आणि पोलिसांना गुंगारा देऊन वाहनचालक पळून गेला, तर वाहन क्रमांकाच्या आधारे मिळणाऱ्या पत्त्यावर दंडांची पावती पाठविण्याची सुविधाही यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. मात्र काही चालकांचा परिपूर्ण पत्ता नोंदवलेला नसतो. अशा वेळी कारवाईत अडथळा येतो.

ई-चलन पद्धत लागू झाल्यापासून १ हजार ७८८ चालकांनी रोख तर ४७५ जणांनी ऑनलाइन दंड भरला आहे. यामधून २ लाख ६० हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. परिमंडळ २मध्ये शीव-पनवेल महामार्ग, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या ठिकाणी एकूण ५७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी २८९ कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

ई-चलन प्रणालीची वैशिष्टय़े

आधुनिक ई-चलन प्रणालीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांची दृश्य टिपण्याची क्षमता अधिक असल्याने प्रत्येक वाहन स्पष्ट दिसेल. वाहनचालकाने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास तात्काळ माहिती मिळेल. त्यामुळे कारवाईचा वेग वाढेल. थेट चित्रीकरणच उपलब्ध होणार असल्यामुळे सिग्नल मोडल्यानंतर, आपण नियम मोडलाच नाही, असा दावा करत पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार कमी होतील. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांसाठी पत्रक जरी करण्यात येणार आहे. या पत्रकात संबंधित वाहनचालकाची माहिती त्याने किती दंड भरणे गरजेचे आहे, कोणता नियम मोडला हे छायाचित्र आणि वाहनाच्या तपशिलासह नमूद करण्यात येणार आहे. तसेच आणि किती दंड भरायाचा आहे, याचा तपशील त्यात असणार आहे.

या आधुनिक प्रणालीमुळे महामार्गावरील अपघात कमी होतील. वाहनचालकाने नियम मोडला तर त्याच्यावर पुराव्यासहित कारवाई करता येईल. अशा प्रकारे शहराला नियम न मोडण्याची सवय लावणे सोपे होणार आहे. येत्या महिन्याभरताच ही प्रणाली सुरू होणार आहे.

– प्रदीप कर्णालू, साहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>

पूनम धनावडे