खारघर रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पुलाला जोडण्यात आलेला सरकता जिना दोन महिन्यांपासून बंद पडला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

खारघर रेल्वे स्थानकाबाहेर सिडकोने बांधलेला पादचारी पूल भारती  विद्यापीठ, बेलपाडा गाव, हिरानंदानी कॉम्प्लेक्स, केंद्रीय विहार येथे जाणाऱ्यांसाठी सोयीचा आहे. या पुलावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यांच्या सोयीसाठीच तिथे सरकत्या जिन्याची सोय करण्यात आली. हा जिना केवळ वर चढण्यासाठी आहे आणि उतरण्यासाठी बाजूला साधा जिना आहे, मात्र जिन्याच्या हालचालीला कारणीभूत असलेला हँडल बेल्ट निकामी झाल्याने हा जिना बंद ठेवण्यात आला आहे. हा जिना वारंवार बंद पडत असतो आणि त्याच्या दुरुस्तीचे कामही सतत सुरू असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गर्भवतींना मोठय़ा गैरसोयीचा सामना करावा लागतो.

आणखी दीड महिना प्रतीक्षा

हे जिने सिम्मलर या कंपनीने बसविले आहेत. जिना वरती जाण्याकरिता वापरण्यात आलेला हँडेल बेल्ट पूर्णत: खराब झाला आहे. हा बेल्ट चीनमध्ये बनविला जातो. तिथून तो इथे येण्यास ३० ते ३५ दिवस लागतात. निविदा प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. त्यामुळे अजून दीड महिना तरी प्रवाशांची दमछाक सुरूच राहणार आहे.