किंमतीमध्ये १५ ते २० टक्के वाढ
पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी खाण्याच्या अनेक वस्तूंची साठवणूक केली जाते. या खरेदीला ‘आगोटी’ची खरेदी असे म्हटले जाते. त्यात सुकी मासळी, मसाले, पापड, लोणचे याबरोबरच तांदूळ, घरातील किराणा सामानांचाही याचाही समावेश असतो. मात्र सध्या या सर्वच वस्तूच्या किमती १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढल्याने ‘आगोटी’च्या खरेदीला आता महागाईचे चटके बसू लागले आहेत.
शेती व जोड व्यवसायावर अवलंबून असलेली जीवनशैली बदलू लागल्याने उरणचे स्वरूप आता निमशहरी झाले आहे. असे असले तरी परंपरेनुसार मे महिना सुरू झाल्यानंतर पावसापूर्वीची तयारीलाही सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी आवश्यक खाद्यपदार्थाच्या खरेदीची परंपरा आजही उरणमध्ये कायम आहे. त्यासाठी पिढय़ान्पिढय़ांची अनेक किराणा मालाची दुकानातून खरेदी जोमाने सुरू आहे. परंतु घरगुती मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरच्या, लोणच्यासाठीचा मसाला, कच्चे आंबे व पापडासाठी लागणारी उडीद डाळ यांच्याही किमती वाढल्या असून मजुरीही वाढल्याने त्याचा परिणाम किमतींवर झाला आहे.
पावसाळ्यात मासेमारीवरील बंदीमुळे ताज्या मासळीचे प्रमाण कमी होत. त्यामुळे ताजी मासळी सुकवून तिची विक्री केली जाते. सध्या मोठय़ा प्रमाणात मासळीचाच दुष्काळ असल्याने सुक्या मासळीच्या किमतीही शंभर रुपयांवर गेल्या आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे उरणच्या तसेच इतर किनाऱ्यावरील स्थानिक मासेमारांना मुंबईतून मासळी आणून ती सुकवावी लागते. त्यामुळे त्यांच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
–के. एल. कोळी, मासळी विक्रेता
ज्या वेळी येथील नागरिकांचे शेती व जोड व्यवसाय ही अनियमित उत्पन्नाची साधणे होती. तेव्हा पासूनच उधारीवर सामान खरेदी करून भाताचे पीक आल्यानंतर दुकानदारांची उधारी फेडण्याची पद्धत होती. कोकणातीलच एक भाग असल्याने पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ही प्रथा आजही कायम असली तरी, सध्याच्या वाढत्या महागाईमुळे आवश्यक असणारे सामानही खरेदी करण्याची हिम्मत होत नाही.
– आत्माराम ठाकूर, नागरिक.