व्यापाऱ्यांकडून चालढकल; ‘एपीएमसी’ प्रशासनाचेही तक्रारींकडे दुर्लक्ष

पूनम सकपाळ

नवी मुंबई : एपीएमसी बाजार समितीमधील काही गाळेधारक तसेच बिगर गाळेधारक यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असून थकीत रक्कम देण्यास व्यापारी चालढकल करत आहेत. कांदा बटाटा बाजारातील ५ कोटी, भाजीपाला बाजारातील १० ते १२ लाख तर फळ बाजारात ५१ लाख ६ हजार ८०९ रुपयांची थकबाकी वसूल करणे बाकी आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी एपीएमसीकडे या थकीत रक्कमेची मागणी करीत आहेत.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार शेतमालाची विक्री झाल्यानंतर २४ तासांत संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बंधनकारक असते. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची रक्कम न दिल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्यास त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी प्रशासनाला आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावात विकून त्यांना योग्य मोबदला द्यावा याकरिता बाजार समितीने व्यापाऱ्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत. मात्र एपीएमसी बाजारातील व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकरणे निदर्शनास येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास चालढकल करतात. परिणामी व्यापारी शेतकऱ्यांच्या विक्री मालाची थकीत रक्कम देत नसल्याने अखेर शेतकरी एपीएमसी प्रशासनाकडे तक्रारी दाखल करतात.

फसव्या व्यापाऱ्यांवर वचक आणण्यासाठी एपीएमसी प्रशासन पणन कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई करून संबंधित व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचा लिलाव करून थकीत देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र एपीएमसीकडूनही ते मिळवून देण्यासाठी वर्ष-दोन वर्षे लागतात.

भाजीपाला बाजार : शेतकरी सोमनाथ सानप यांना त्यांचे थकीत ५ लाख रुपये परत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सन २००७-०८ मध्ये त्यांचे हे पैसे थकविले आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी याबाबत बाजार समितीकडे तक्रार केली. मात्र ज्या व्यापाऱ्याने पैसे थकविले त्याने तो गाळा दुसऱ्या व्यापाऱ्याला विकला आहे. मात्र आता जो व्यापारी आहे त्याच्याकडून ही थकीत रक्कम वसूल करण्यात येणार आहे. जर त्या व्यापाऱ्याने रक्कम अदा केली नाही तर गाळ्याचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसचिव यांनी दिली आहे. भाजीपाला बाजारात ३५ पैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत तर ५ जणांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भाजीपाला बाजार सचिव सुनील सिंगतर यांनी दिली.

कांदा बटाटा बाजार  : कांदा बटाटा बाजारातील २० ते २५ गाळेधारक आणि बिगर गाळेधारक यांनी ५ कोटी थकबाकी ठेवली आहे. सन २०१० पासून २०१९ पर्यंत ३ कोटी रुपयांची थकबाकी होती, तर दोन वर्षांत त्यात २ कोटींची वाढ झाली आहे. एका व्यापाऱ्याकडून १ कोटी २५ लाख रुपये येणे आहे अशी माहिती मिळाली आहे. एपीएमसीकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे, मात्र योग्य कारवाई होत नसून बराच कालावधी लागतो. गाळे लिलाव करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देऊ, असे बाजार समिती सांगते. मात्र तोपर्यंत गाळेधारक व्यापार करीत असतात. तात्काळ कारवाई करून गाळे ताब्यात घेऊन शेतकऱ्यांची थकीत रक्कम लगेच का दिली जात नाही, असा सवाल व्यापारी महादेव राऊत यांनी केला आहे.

फळ बाजार  : एप्रिल २०१८  ते मे २०२१ या काळातील शेतकऱ्यांच्या शेतमाल थकीत रक्कमेच्या १५ तक्रारी दाखल असून ५१ लाख ६ हजार ८०९ रुपये थकीत वसुली बाकी आहे. बाजार समितीने सर्वाना नोटीस बाजवली असून सर्व प्रकरणे सुनावणी प्रक्रियेत आहेत अशी माहिती एपीएमसीने दिली आहे. यामध्ये एक प्रकरण न्यायालयात आहेत तर एक ओपन शेडचे आहे. गाळे धारकांकडून कायद्याच्या चौकटीतून थकीत रक्कम वसूल करता येते, मात्र ओपन शेड धारकांकडून वसूली करणे अडचणीचे जाते. तसेच शेतकऱ्यांचे १७ लाख २४ हजार थकीत वसूल जमा आहे. मात्र करोनामुळे शेतकरी येण्यास कचरत आहेत, अशी माहिती फळ बाजार उपसचिव संगीता अढांगळे यांनी दिली.

भाजीपाला बाजारात एकूण ३५ तक्रारी होत्या. त्यापैकी ३० निकाली काढल्या आहेत, तर पाच तक्रारींची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. एपीएमसी गाळेधारकांना नोटीस देऊनही थकीत रक्कम परत केली नाही तर गाळा सील करून लिलाव करून शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळवून दिली जाते.

– सुनील सिंगतर, उपसचिव, भाजीपाला बाजार समिती