गणेशोत्सवादरम्यानच्या भांडणामुळे कळंबोलीमध्ये हवेत गोळीबार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसायाने वाहतूकदार असलेल्या भालसिंग बल या तरुणाने हा गोळीबार केला आहे. सेक्टर १६ येथील डी मार्ट दुकानाशेजारील निलकांत हाईट्स या इमारतीसमोर हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री एक वाजता घडला. आरडाओरडा करून स्वत:जवळील परवानाधारी पिस्तुलातून अंधारात दोनदा गोळीबार करून तो तेथून निघून गेला. या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर साईकृपा मित्र मंडळाचा गणपती असून बल हासुद्धा या मंडळात ये-जा करत असे. ही घटना दडपण्यासाठी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र एका जागरूक नागरिकाने पोलिसांना दूरध्वनी केल्याने या घटनेला वाचा फुटली. शस्त्र परवाना कायद्याचा भंग केल्याप्रकरणी भालसिंग बल याच्याविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनंतर बल हा फरार आहे.
पोलीस उपनिरीक्षक पी. एस. दळवी यांच्या गस्तपथकाची गाडी मंगळवारी मध्यरात्री रोडपाली येथील साईकृपा मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गेली होती. एक तासांने दळवी यांच्या मोबाइलवर एका जागरूक नागरिकाचा दूरध्वनी आला. साईकृपा मित्र मंडळाजवळ कार्यकर्त्यांमध्ये भांडण झाले असून तेथे गोळीबार झाल्याची माहिती त्याने दिली. दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह साईकृपा मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाकडे धाव घेतली. मात्र सर्व कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी अखेर मंडळाचे अध्यक्ष अमर ठाकूर यांच्यासह सर्वाना त्वरित हजर होण्याच्या सूचना केल्या. यानंतर सर्व कार्यकर्ते हजर झाले. पोलिसांच्या भडिमारानंतर सितेंद्र सोहनलाल शर्मा आणि अध्यक्ष अमर ठाकूर यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सितेंद्र आणि अमर बोलत असताना भालसिंग त्यांच्याजवळ स्कॉर्पीओ जीपमधून आला. त्याने आरडाओरड करून तेथे गोळीबार केला आणि तो निघून गेला. सितेंद्र आणि भालसिंग यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भालसिंग भेटेपर्यंत सित्तू व अमरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर भालसिंगच्या नातेवाईकांनी त्याला हजर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांना सोडले.
पिस्तूलमुळे प्रतिष्ठा वाढते..
मागील वर्षी पनवेल तालुक्यामध्ये ६१२ जणांना पोलिसांनी पिस्तूल परवाना दिला आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि के. एल. प्रसाद यांच्या कार्यकाळात नवीन शस्त्र परवाने मिळत नव्हते. त्यामुळे अनेकांनी इतर ठिकाणाहून शस्त्र परवाने मिळवून नवी मुंबईत त्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची शक्कल लढवली होती. काही वर्षांपूर्वी आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी पनवेलच्या एका ढाब्यावर अशाच प्रकारे आपल्या परवानाधारी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गायकवाड यांना पुन्हा शस्त्राचा परवाना दिला नाही. अशीच घटना गेल्या वर्षी कामोठे येथे क्रिकेट सामन्यादरम्यान घडली. विकास घरत या तरुण उद्योजकाने गोळीबार केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती. भालसिंग याला गेल्या वर्षी शस्त्र परवाना मिळाला होता. त्याचा शस्त्र परवाना मूळचा पंजाब येथील असून त्याचे नूतनीकरण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2015 रोजी प्रकाशित
पनवेलमध्ये गणेशोत्सवात बंदुकीचे बार
गणेशोत्सवादरम्यानच्या भांडणामुळे कळंबोलीमध्ये हवेत गोळीबार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 24-09-2015 at 02:33 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fired in the air after groups clash in kalamboli during the ganesh festival